पूजाची अन् वीरमातेची घेतली भेट
By Admin | Updated: July 8, 2015 22:03 IST2015-07-08T22:03:57+5:302015-07-08T22:03:57+5:30
भिरडाचीवाडी : भुर्इंज पोलिसांनी दाखवली माणुसकी

पूजाची अन् वीरमातेची घेतली भेट
भुर्इंज : ओझर्डे स्फोटातून बचावलेल्या पूजा पवार या चिमुरडीची चौकशी करतानाच तिला कपडे, फळे व खाऊ दिला. तसेच यावेळी भिरडाचीवाडीतीलच २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यातील शहीद बापूसाहेब धुरगुडे यांच्या आईची भुर्इंज पोलिसांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट घेऊन चौकशीही केली. यानिमित्ताने पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन घडले.
कोल्हापूरच्या कण्हेरी मठातील रुग्णालयातून घरी आलेल्या पूजा पवारला भेटण्यासाठी पवार तिच्या घरी गेले होते. जाताना त्यांनी पूजासाठी नवे कपडे, फळे व खाऊही सोबत नेला होता. पूजाशी गप्पा मारताना ‘तू आता बरी झाली आहेस, घाबरू नकोस,’ असे सांगून तिच्या कुटुंबीयांनाही दिलासा दिला. आर्थिक मदतीसाठी कधीही कसलीही अडचण आली तर संपर्क साधण्यास सांगितले.
त्यानंतर ते याच गावात असणाऱ्या वीरमाता बनुबाई धुरगुडे यांना भेटायला गेले. बनुबाई धुरगुडे यांचे सुपुत्र बापूसाहेब धुरगुडे हे दि. २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात शहीद झाले होते. दरवर्षी २६ नोव्हेंबरला सहायक पोलीस निरीक्षक पवार त्यांच्या घरी जातातच; पण यावेळी अचानकपणे ते या वीरमातेला भेटून त्यांची चौकशी केली. (वार्ताहर)
आठवणी जागविल्या...
प्रकृती ठीक नसल्याने वीरमाता बनुबाई धुरगुडे यांना स्वत:सोबत दवाखान्यात येण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी विनंती केली. त्यांच्या या आस्थेवाईकपणामुळे बनुबाई या पवार यांच्या गळ्यात पडून रडल्या. ‘माझ्या पोरावाणीच माझी चौकशी करतुयास,’ असे म्हणत बापूसाहेबांच्या आठवणी जागविल्या. यावेळी पवार यांनी सोबत आणलेली फळेही त्यांना दिली. भुर्इंज पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीची परिसरात चर्चा होत आहे.