राजकीय फड रंगात, तरुण कार्यकर्ते सैराट
By Admin | Updated: July 18, 2016 00:30 IST2016-07-18T00:19:58+5:302016-07-18T00:30:02+5:30
नगरपंचायत निवडणूक : वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही थोपाटले दंड

राजकीय फड रंगात, तरुण कार्यकर्ते सैराट
दशरथ ननावरे / खंडाळा
खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची आरक्षणे जाहीर झाल्यामुळे प्रमुख पक्षांनी तयारीवर जोर दिला आहे. आरक्षणामुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले असले तरी बहुतांशी मातब्बरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधीही मिळाली आहे. सुरुवातीपासूनच मोर्चेबांधणीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे खंडाळ्यातील राजकीय फड चांगलाच रंगात आला असून, तरुण कार्यकर्ते सैराट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खंडाळ्याच्या प्रभागरचना आणि आरक्षणे आपल्या पथ्यावर पडावीत, यासाठी पाण्यात घातलेल्या देवांची अखेर सुटका झाली असून, मनाजोगे आरक्षणे पडल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह संचारला आहे. तर ज्यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती. मात्र, आरक्षणामुळे बेरंग झाला, अशांनी शेजारच्या प्रभागात चाचपणीही सुरू केली आहे. तर काही ठिकाणी मी नाही तर माझ्याच घरातील महिलांना संधी मिळाली.
खंडाळ्यातील नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन प्रुमख पक्षांसह शिवसेना व भाजपानेही दंड थोपाटल्याने राजकीय आराखड्यात भर पावसाळ्यातही धुरळा उडायला लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे आणि पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्या नेतृत्वाखालील गेल्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या अॅड. शामराव गाढवे, प्रा. भरत गाढवे यांनी कंबर कसली आहे. तर दोन्ही प्रमुख पक्षांतील दुफळीचा फायदा उठवून अभिजित खंडागळे यांनी कमळ फुलविण्याचा तर मंगेश खंडागळे यांनी आपला बाण अचूक ठिकाणी मारण्याचा निर्धार केला असल्याने खंडाळ्याची निवडणुकीत राजकीय वातावरण तापणार, हे निश्चित आहे.
नव्या आरक्षणामुळे काँग्रेसचे अनिरुद्ध गाढवे यांना फटका बसला असला तरी त्यांचे वर्चस्व लक्षात घेता दुसऱ्या प्रभागात संधी घेऊ शकतात. तर त्यांच्यासोबत काँग्रेसमधील सचिन खंडागळे, युवराज गाढवे, प्रल्हाद खंडागळे, किरण खंडागळे, प्रकाश गाढवे, विकास गाढवे, भानुदास गाढवे, जितेंद्र खंडागळे, ज्योतिबा जाधव, स्वाती जाधव, साजिद मुल्ला, योगेश गाढवे, संतोष बावकर अशी मोठी फळी पक्षासाठी मैदानात आहे. त्यांच्या राजकीय आराखड्यांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीनेही मोळी बांधली असून, अॅड. शामराव गाढवे, प्रा. भरत गाढवे, संपतराव खंडागळे, शैलेश गाढवे, दिगंबर गाढवे, प्रशांत गाढवे, लताताई नरुटे, शिवाजी खंडागळे, भाऊसाहेब गाढवे, अप्पासाहेब वळकुंदे, जावेद पठाण अशा प्रमुखांसह तरुण कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सत्तासंघर्ष चांगलाच उफाळणार आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख मंगेश खंडागळे, गोविंद गाढवे, शेखर खंडागळे, अमोल गाढवे, अस्लम सय्यद, सचिन जाधव, नारायण जाधव, गणेश गाढवे या कार्यकर्त्यांनी प्रमुखांच्या विरोधात धनुष्य ताणले असून, खंडाळा शहरात नव्याने प्रवेश केलेल्या भाजपाची रणनीती अभिजित खंडागळे यांनी अद्यापही गुलदस्त्यात ठेवून हातचा राखला आहे. तर रिपब्लिकन पक्षाला काही प्रभाग स्वतंत्र झाल्याने त्यांनी तेवढ्यावरच लक्ष केंद्रित केले आहे.
खंडाळ्यातील मूळ गावठाणात अपेक्षित प्रभाग झाल्याने लढतीची चुरस वाढणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच होणार असून, आपली ताकद वाढविण्यासाठी इतरत्र गळ टाकून शहानिशा करण्यावर भर दिला जाईल. आजपर्यंत ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीत गटातटाला महत्त्व होते. तर आता नगरपंचायतीमुळे पक्षीय शिरकाव आणि प्रभागातील ताकद यावरच खेळ रंगणार आहे. त्यामुळे स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी सर्वांची पडताळणीला वेग आला आहे.