कराड : येथील उपजिल्हा रुग्णालयात परवानगी न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्यांच्या गणवेशात येऊन मदतीच्या नावाखाली राजकीय अजेंडा राबवित आहेत, असा आरोप करत युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी त्या विरोधात जोरदार आक्षेप नोंदवला. मोरे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे. संघाने राजकीय हेतूने गणवेशात सुरू केलेले कथीत समाजकार्य त्वरित बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्याची माहिती मिळताच युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे त्वरित उपजिल्हा रुग्णालयात गेले. त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांवर हरकत घेत विनापरवाना त्यांनी सुरू केलेल्या मदतीच्या नावाखालील त्यांच्या अजेंड्याचा विरोध केला. त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक शिंदे यांची भेट घेऊन तक्रार दिली.
मोरे म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू आहे. कोविडच्या काळात नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सारेचजण सगळ विसरून कामाला लागले आहेत. मात्र त्याही स्थितीत आपला राजकीय अजेंडा राबविण्याच्या हेतूने संघाचे कार्यकर्ते त्यांच्या राजकीय गणवेशात उपजिल्हा रुग्णालयात विनापरवाना मदतीसाठी आले होते. त्यांनी तेथे वादही घातल्याने आम्ही तेथे गेलो. त्यांचा तो राजकीय अजेंडा असल्याचे लक्षात येताच त्याविरोधात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रङारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांनी त्यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आमची तक्ररा दाखल होताच प्रशासनाने संघाला ताकदी देऊन त्याना थांबविले आहे.