अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलीस हैराण
By Admin | Updated: June 11, 2015 00:53 IST2015-06-10T21:43:20+5:302015-06-11T00:53:55+5:30
सुट्यांचे वांदे : ब्रिटीशकालीन मंजूर पदसंख्या एवढेच आताही मनुष्यबळ

अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलीस हैराण
परळी: अतिरिक्त ताण-तणावामुळे दिवसेंदिवस पोलिसांवरील ताण आणखीनच वाढत चालला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण ग्रामीण भाग येत आहे. मात्र पोलिसांचे अपुरे मणुष्यबळ आणि वाढत चाललेला क्राईम रेट यामुळे पोलीस अक्षरश: हतबल झाले आहेत.सध्याही पोलिसांचे ब्रिटीशकालीन कामकाज सुरू आहे. १९२९ च्या मंजूर पदसंख्ये एवढेच कर्मचारी सध्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांचीही काम करताना मोठी दमछाक होत आहे. दुसरीकडे पोलिसांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. सततच्या कामामुळे कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत चालला आहे.
सातारा तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत सुमारे १५२ गावे येतात. त्यामध्ये वाडी-वस्त्या आहेत. गावची लोकसंख्याही वाढत चालली आहे. गावांच्या हद्दी वाढल्या आहेत; परंतु पोलिसांची संख्या मात्र त्या मानाने वाढली नाही. इंग्रजांच्या कालावधीत १९२९ मध्ये जी पदसंख्या होती तेवढी पदसंख्या २०१५ मध्येही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाण्याचा कारभार चालविताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही जीव मेटाकुटीला येत आहे.सातारा तालुका पोलीस ठाण्यात सध्या ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. आठवड्यातील चार दिवस कर्मचाऱ्यांना केवळ बंदोबस्त, पेट्रोलिंग काम करावे लागते. मोर्चे, आंदोलने, गटतटातील वाद, मिरवणुका यासाठी सातत्याने बंदोबस्त वाढवावा लागतो. तालुका पोलीस ठाण्यात सातारा शहरातीलही काहीसा भाग जोडला गेला आहे. त्यामुळे वाढता विस्तार पाहता लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. रोजगाराच्या इतर संधी येथे निर्माण झालेल्या असल्याने बाहेरून येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
या सगळ्यांवर अवघे चार अधिकारी व ५५ कर्मचारी कसे नियंत्रण राखणार, हा मोठा प्रश्नच आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर्मचारी वाढीची मागणी केल्यास आश्वासने सातत्याने दिले जात आहेत. मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि ठाण्याच्या हद्दीत गावे जास्त आहेत. त्यातच महिला कर्मचारी संख्या जास्त असल्याने अनेकवेळा अडीअडचणी येत आहेत. त्यामुळे अजून दहा कर्मचारी वाढल्यास कामाचा ताण थोडासा कमी होऊ शकतो.
-दत्तात्रय नाळे, पोलीस निरीक्षक सातारा तालुका
सणासुदीचे दिवस बंदोबस्तामध्ये !
सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकूण ४ अधिकारी व ५५ कर्मचारी आहेत. त्यामध्ये एक महिला अधिकारी व १९ महिला कर्मचारी आहेत. त्यामुळे पुरुष कर्मचाऱ्यास जास्त कामाचा ताण पडत आहे. महिला कर्मचाऱ्यास रात्रपाळीस ठेवता येत नसल्याने पुरुष कर्मचाऱ्यास दिवस-रात्र काम करावे लागत आहे.
पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्हे घडतात. त्यांच्या तपासासाठीही पुरेसा वेळ कर्मचाऱ्यांना देता येत नाही. सणासुदीला तर सुटी मिळणे सोडाच, आठवडा सुटीही अनेकदा मिळत नाहीत. लगतच्या पोलीस ठाण्याच्या मदतीला जावे लागते, ते वेगळेच. या कारणांमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवरील ताण आणखीनच वाढतच चालला आहे.