पाचजणांच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: August 2, 2015 00:11 IST2015-08-02T00:10:44+5:302015-08-02T00:11:00+5:30
बबलू माने खून प्रकरण : फरार संशयितांचा शोध सुरूच

पाचजणांच्या पोलीस कोठडीत वाढ
कऱ्हाड : बबलू मानेच्या खूनप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पाचजणांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना आणखी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, बाबर खान खूनप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदे व अक्षय शेंद्रे यांनाही ५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शहरातील मंगळवार पेठेत २० जुलैला टोळी युद्धातील पूर्ववैमनस्यातून बबलू ऊर्फ उमेश माने याच्यावर बाबर खान याने गोळ्या झाडल्या होत्या. बबलू मानेची आई अनुसया यांनाही गोळी लागून त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेत बबलू मानेचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावरून पळून जात असताना बाबर खानला जमावाने दगडाने ठेचून ठार केले. बबलू मानेवरील गोळीबारात संशयित म्हणून बाबर खानचा रायडर फिरोज बशीर कागदी याला व त्यानंतर मोहसिन जमादार, इब्राहिम सय्यद, जावेद शेख व इरफान इनामदार यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यांना आणखी पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या कटात सहभागी असलेला सल्याचा मुलगा असिफ शेख याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अहमदनगर येथे ताब्यात घेऊन अटक केली. त्याला विशिष्ट कारणास्तव १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती करून न्यायालयाच्या परवानगीने त्याला रत्नागिरी येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करीत आहेत.
अनेकांचा पोबारा
बबलू माने खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपींकडे पोलिसांनी कसून तपास केला आहे. त्यातून आणखी काहीजणांची नावे निष्पन्न झाली असून कारवाईच्या भीतीने काहीजणांनी शहरातूनच पोबारा केल्याची चर्चा आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.