सातारा : ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल तर ५ कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी तुषार ऊर्फ तात्यासोा आबाजी खरात (मूळ रा. पांढरवाडी, ता. माण, सध्या रा. मुंबई) यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांनी स्वत: याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.मंत्री गोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तुषार खरात हे माण विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत. तुषार खरात यांनी सोशल मीडियावर वारंवार माझ्याबाबत जाणीवपूर्वक, हेतूपुरस्पर मानहानीकारक व बदनामीकारक पोस्ट प्रसिद्ध केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खरात यांनी माझे कार्यकर्ते बळवंत पाटील यांना मुंबई येथे बोलावून घेतले.
त्यावेळी त्या भेटीत खरात हे पाटील यांना म्हणाले की, ‘जयकुमार गोरे यांना मिटवून घ्यायला सांगा. अन्यथा त्यांचे मंत्रिपद मी घालवणार आहे. मिटवायचे असेल तर मंत्री जयकुमार गोरे यांना ५ कोटी रुपये द्यायला सांगा. त्यामधील १ कोटी रक्कम तक्रारदार महिलांना देणार आहे. उर्वरित रक्कम माझ्यासाठी ठेवणार’ असल्याचे खरात म्हणाले.
दरम्यान, तुषार खरात यांच्यावर शनिवारी दहिवडी व वडूज पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. वडूज येथील पोलिस ठाण्यामध्ये शेखर सुरेश पाटोळे (३६, रा. वडूज, ता. खटाव) यांनी तुषार खरात व अनोळखी दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीची तक्रार दिली आहे. दरम्यान, वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुंबईतून खरात यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वडूज पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.