पंतप्रधानांची उद्घाटने काँग्रेसच्याच कामांची !
By Admin | Updated: August 23, 2014 23:49 IST2014-08-23T23:47:13+5:302014-08-23T23:49:22+5:30
कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

पंतप्रधानांची उद्घाटने काँग्रेसच्याच कामांची !
कºहाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या करीत असणारी उद्घाटने ही पूर्वी काँग्रेसने केलेल्या कामांचीच आहेत. आगामी पाच वर्षे जरी मोदी उद्घाटने करीत फिरले तरी ती संपणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, राहुल चव्हाण, आदी उपस्थित होते. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती विचारली असता, ‘काही विशिष्ट पक्षांकडून काँग्रेसच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा शोध जरूर घेऊ. तसेच उद्धव ठाकरेंनी मरळीच्या सभेत केलेल्या टीकेला योग्यवेळी जशास तसे उत्तर देऊ,’ असेही मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. आघाडीतील जागावाटपाची चर्चा दिल्लीत झाली आहे. आम्ही १७४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत; पण निवडून येण्याची क्षमता तपासून एखादा इच्छुक मुलाखतीला आला नसला, तरी त्याचा विचार होऊ शकतो. उरमोडीचे पाणी पतंगरावांनी पळविले का? असे विचारले असता, ‘कुणी पळविले आणि कुणी नेले? ही चुकीची माहिती आहे. पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. शेतीसाठी ते दिले जाणार नाही,’ असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी) आरक्षणाचे प्रस्ताव केंद्राकडेच पाठवावे लागतात धनगर आणि लिंगायत समाजांच्या आरक्षणाचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले जाणार असल्याने ते लटकणार काय? असे छेडले असता मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रस्ताव केंद्राकडेच पाठवावे लागतात, असे सांगितले. मात्र, मग लिंगायत समाजासाठी नेमलेली मंत्री सोपल समिती काय कामाची? यावर मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले. ‘कºहाड दक्षिण’वरील स्वारीचा ‘सस्पेन्स’ कधी संपणार? असा प्रश्न विचारताच ‘संपेल आणि तुम्हाला लवकरच समजेल,’ असे सूचक उत्तर मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले; पण नेमका ‘सस्पेन्स’ कधी संपणार, हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.