प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी
By Admin | Updated: January 15, 2015 23:28 IST2015-01-15T22:21:06+5:302015-01-15T23:28:53+5:30
अश्विन मुदगल : कडक कारवाई

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी
सातारा : राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
गृह विभागाने १ जानेवारी रोजी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामान्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.
हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे.
ध्वजसंहितेमधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. कोणीही प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा.
खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशा प्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सूर्र्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नष्ट करावेत. हे करताना उपस्थित सर्वांनी उभे रहावे व ते पूर्णपणे जळून नष्ट होईपर्यंत ती जागा सोडू नये, असा उल्लेख परिपत्रकात आहे.
तेव्हा आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा १९७१ कलम २ नुसार तातडीने कारवाई करण्यात येते, असेही या निमित्ताने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)