वेळू गावात १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड
By Admin | Updated: July 29, 2016 23:29 IST2016-07-29T20:55:09+5:302016-07-29T23:29:57+5:30
गावकऱ्यांचा निर्णय : भुईमूग पेरणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

वेळू गावात १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे कृषी सप्ताह निमित्त बीबीएफ द्वारे भुईमूग पेरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत वेळू गावात केलेल्या बांध बंदिस्तीवर तूर लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करून गावामध्ये १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्याची तयारी गावकऱ्यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे कौतुकही केले.
यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार जोगेंद्र्र कट्यारे, पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी राजेश भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुदगल यांनी रुंद सरी वरंबा पेरणी पद्धत, बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष असल्यामुळे त्यांनी कडधान्य पिकांचे महत्त्व सांगून शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाची लागवड करून डाळीचे दर कमी करण्यास मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शेवटी केले.
अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भोसले यांनी शेतकऱ्यांना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यामुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या कृषी
जागृती सप्ताहाविषयी माहिती दिली
व कृषी विभागाच्या पीक प्रात्यक्षिकांची माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत : साळुंखे
शेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड करून त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करावी. कोरेगाव तालुक्यामध्ये नवीन बांध बंदिस्तीवर ५९०
हेक्टर क्षेत्रावर बांधावर तूर लागवडीसाठी बीडीएन- ७११ वाणाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. याची लागवड बांधावरती करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.