एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:13+5:302021-06-23T04:25:13+5:30
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून बाजारपेठ ही सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी ...

एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावे
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून बाजारपेठ ही सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. परंतु महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून एकाच वेळी स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी होऊ नये यासाठी सकाळी अत्यावश्यक सेवा व दुपारनंतर इतर दुकानांना उघडण्यास परवानगी देऊन बाजारपेठेतील गर्दीचे विभाजन करावे, अशी मागणी महाबळेश्वर येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.
तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर खाली आल्याने कोरोनासंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली असून, बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून येथील स्थानिकांपेक्षा पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शनिवार, रविवारी ही संख्या खूप पटीने वाढते. येथील स्थानिक नागरिक जीवनावश्यक बाबींच्या खरेदीसाठी सकाळी बाहेर पडतात. त्यामुळे सकाळी दोन ते तीन तास बाजारपेठेत ही स्थानिक नागरिकांची गर्दी होते. पर्यटक पावसाळी वातावरणामुळे सकाळी उशिरा उठतात. त्यानंतर ते परिसरातील विविध स्थळांना भेटी देतात. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सायंकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. त्यामुळे महाबळेश्वरची बाजारपेठ ही सायंकाळनंतर पर्यटकांनी नेहमी गजबजून जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा विचार करून दुकानांच्या वेळा ठरविल्या आहेत.
या वेळेनुसार स्थानिक व पर्यटकांची एकाच वेळी गर्दी होणार आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही अधिक आहे म्हणून या गर्दीचे विभाजन करणे आवश्यक आहे. सकाळी स्थानिक नागरिकांच्या सोईसाठी सर्व अत्यावश्यक बाबींची दुकाने नेहमीप्रमाणे सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत उघडली जातील. दुपारी दोननंतर ही सर्व दुकाने बंद होतील. त्यानंतर स्थानिक विक्रेत्यांची इतर दुकाने सुरू होतील ही दुकाने रात्री आठ अथवा नऊ वाजता बंद होतील. बाजारपेठे अशा प्रकारे दोन वेळांमध्ये उघडण्यात आल्यास गर्दीचे विभाजन होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही टाळता येणार आहे.
उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व्यापारी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक उपस्थित होते.