मुरूमासाठी खोदलेले खड्डे जीवघेणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:06+5:302021-06-26T04:26:06+5:30
तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील साकुर्डी येथे बेकायदा मुरूम उत्खनन करून काहीजणांनी मोठमोठे खड्डे पाडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी ...

मुरूमासाठी खोदलेले खड्डे जीवघेणे!
तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील साकुर्डी येथे बेकायदा मुरूम उत्खनन करून काहीजणांनी मोठमोठे खड्डे पाडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे डोह तयार झाले असून, हे डोह अपघाताला निमंत्रण देत आहेत. गत आठवड्यात येथील एका डोहात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही महसूल विभागाला जाग आलेली नाही.
साकुर्डी येथे गावठाणालगत गायरान जमीन आहे. पूर्वी ग्रामस्थ या गायरान जमिनीतील मुरूम गरजेपोटी थोड्या प्रमाणात आणत होते. मात्र, गत काही वर्षांपासून गावातील काही ट्रॅक्टरधारकांनी तेथील मुरूम बेकायदेशीरपणे विकून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. गौण खनिज तस्करीचा धंदा येथे बेधडक सुरू आहे. गावातील काही ग्रामस्थांनी संबंधितांना वेळोवेळी आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री-अपरात्री, पहाटे तसेच भर दिवसाही मुरूमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात होती. त्यामुळेच गतवर्षी वस्ती व मौजे साकुर्डी या दोन्ही ग्रामपंचायतींनी बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ग्रामसभेत ठराव केला. मुरूम उत्खनन केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा निर्णयही ग्रामपंचायतीने घेतला. मात्र, महसूल विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे मुरूम उत्खनन करणाऱ्यांचे फावले. लाखो रुपयांच्या मुरूमाचे याठिकाणी उत्खनन व वाहतूक करण्यात आली असून, त्याचे ऑडिट व वसुली करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
मुरूमासाठी या गायरान जमिनीवर मोठमोठे खड्डे खोदले गेले आहेत. या खड्ड्यांजवळ कसलीही सुरक्षा नाही. त्यामुळे पावसाळ्यात या खड्ड्यांचा डोह तयार होत असून, या डोहांमुळे दुर्घटना घडत आहेत. गत आठवड्यात बारा वर्षाच्या मुलाचा अशाच एका डोहात बुडून मृत्यू झाला आहे. साकुर्डीतील मुज्जफसर समीर मुलाणी हा मुलगा त्याचा भाऊ व मित्रांसोबत गायरानाकडे गेला होता. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला.
- चौकट
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
साकुर्डी येथील गायरान जमिनीत अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव केला आहे. मात्र, तरीही उत्खनन बंद झालेले नाही. रात्री-अपरात्री येथे चोरून मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. बेकायदा मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे. तसेच ज्यांनी हे खड्डे खोदले त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जात आहे.
फोटो : २५ केआरडी ०२
कॅप्शन : साकुर्डी (ता. कऱ्हाड) येथे गायरान जमिनीत मुरूमासाठी खोदण्यात आलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत.