पिंजरा वाघवस्तीत अन् बिबट्या अंदोरीत!
By Admin | Updated: July 27, 2016 00:27 IST2016-07-27T00:19:03+5:302016-07-27T00:27:09+5:30
वनकर्मचाऱ्यांना चकवा : अचानक समोर आल्याने अंगणवाडी शिक्षिका भयभीत

पिंजरा वाघवस्तीत अन् बिबट्या अंदोरीत!
खंडाळा : अंदोरीसह भादे, वाठार परिसरात आठ दिवस ठिकठिकाणी दिसणाऱ्या बिबट्याने वनविभागाची पळता भुई थोडी केली आहे. वाठार येथील वाघवस्तीच्या शिवारात पिंजरा लावून वनकर्मचारी दोन दिवसांपासून वाट पाहत असतानाच त्यांना बिबट्याने चकवा दिला. अंदोरी येथील कांचनवस्ती ते देवस्थान जमिनीच्या शिवारात मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले.
बिबट्याला पाहिल्यामुळे अंगणवाडी शिक्षिका यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना उपचारासाठी लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.
खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथील रुई शिवारात रविवार, दि. १७ रोजी बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी भादे येथील होडी शिवारात तर वाठार येथील वाघवस्ती शिवारात बिबट्या त्याच्या बछड्यासह दिसला होता.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असल्याने त्याला पकडण्याची मागणी होत होती.
नागपूर येथील वन्यजीव संरक्षण विभागाच्या परवानगीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पिंजराही लावला. दोन दिवस दक्षता घेऊनही बिबट्या हाती लागला नाही. एकंदर परिस्थिती पाहता बिबट्या नदी पलीकडे पसार झाला की काय, अशी चर्चा सुरू असतानाच अचानक अंदोरी भागात बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले.
रुई येथे अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या सुरेखा कराडे या सकाळी अकराच्या सुमारास रुईला चालत जात असताना समोरून अचानक बिबट्या दिसला. यामुळे कराडे या घाबरल्या असून, त्यांना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती समजताच वनरक्षक एम. के. करपे आणि पी. एम. गाढवे यांनी तातडीने कांचनवस्ती भागात जाऊन पाहणी केली. मात्र, त्यांना दिसला नाही. तरीही वन अधिकारी या परिसरात तळ ठोकून आहेत. अंदोरी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, बिबट्या दिसल्या ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)