फलटणला कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा घोळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST2021-05-31T04:27:42+5:302021-05-31T04:27:42+5:30
फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा घोळ अद्याप मिटलेला नाही. रविवारी जिल्हा माहिती कार्यालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यातील बाधितांची संख्या ...

फलटणला कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा घोळ कायम
फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा घोळ अद्याप मिटलेला नाही. रविवारी जिल्हा माहिती कार्यालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यातील बाधितांची संख्या २७१ नोंदविण्यात आली आहे तर स्थानिक प्रशासनाकडून रुग्ण संख्या ८४ इतकी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे नक्की कोणती संख्या ग्राह्य मानायची हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तालुका प्रशासनाकडून तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८४ असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संसर्ग काळात थोडासा दिलासा मिळाला. मात्र त्याचवेळी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालातील आकडेवारी चिंता करायला लावणारी आहे. बाधितांची संख्या रविवारी २७१ तर शनिवारी ९५५ इतकी नोंदविण्यात आली आहे. सलग तीन दिवस एक हजाराच्या आसपास रुग्ण संख्या जिल्हा प्रशासनाने नोंदविल्याने तालुक्याला धडकी भरली होती. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन ही संख्या कमी असल्याचे सांगत आहे.
स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाच्या तफावतीमुळे नागरिकांचा मात्र गोंधळ उडाला आहे. तरी प्रशासनाने हा गोंधळ दूर करावा, अशी मागणी होत आहे.