फलटणचे ‘औषध’ राष्ट्रीय स्तरावर लागू!

By Admin | Updated: April 20, 2016 00:24 IST2016-04-19T23:20:59+5:302016-04-20T00:24:09+5:30

औषधविक्रेत्याची कलाकृती : लघुपटाला राष्ट्रीय पातळीवर गौरविले

Phalantank's 'medicine' applied at the national level! | फलटणचे ‘औषध’ राष्ट्रीय स्तरावर लागू!

फलटणचे ‘औषध’ राष्ट्रीय स्तरावर लागू!

सातारा : फलटणमधील कलावंताने तयार केलेल्या ‘औषध’ या लघुपटाला सर्वोत्तम लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली १७ वर्षे फलटणमध्ये औषधाचे दुकान चालविणारे अमोल देशमुख हे चार वर्षांपासून फिल्ममेकिंगचे तंत्र आत्मसात करीत असून, यावर्षीच्या स्पर्धेत सात हजारांहून अधिक लघुपट असताना ‘औषध’ लघुपटाला ‘बेस्ट शॉर्ट फिक्शन फिल्म’चा पुरस्कार मिळाला आहे.
लहानपणापासूनच कलाक्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा बाळगणारे अमोल देशमुख यांना चित्रपट क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमांची माहिती नव्हती.
फार्मसीच्या व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांना ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ (एफटीआयआय) संस्थेची माहिती मिळाली. संस्थेत त्यांनी काही मित्र जमविले व त्यांना सहायक म्हणून काम करता करता माध्यमातील तंत्र जाणून घेतले. माजी अधिव्याख्याते समर नखाते आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांना ते आपल्या यशाचे श्रेय देतात.
समूहात काम करण्याची आवड असल्यामुळे आणि लघुपट, चित्रपट ही समूहकला असल्याने ‘औषध’ लघुपट तयार करताना आपल्याला मजा आली, असे ते सांगतात.
अधिक क्षमतेचे कॅमेरे किंवा ध्वनियंत्रणा न वापरतासुद्धा चांगला लघुपट तयार करता येतो, हे ‘औषध’च्या यशामुळे अधोरेखित झाले आहे. ‘आपलेच व्यक्तिगत अनुभव पटकथेतून मांडणे अवघड असते; पण पटकथा भक्कम झाल्यास कमीत कमी शब्दांत तसेच कॅमेऱ्याचा योग्य वापर आणि ध्वनियंत्रणा व संकलनाची लयबद्ध जोड
असल्यास चांगला सिनेमा करता
येतो,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

काय आहे लघुपटात...
औषधविक्रेत्याने तयार केलेल्या ‘औषध’ नावाच्या लघुपटात अपेक्षेप्रमाणेच अनुभवाची सामग्री वापरण्यात आली आहे. एका औषधाच्या दुकानातील कामगार एका वयोवृद्ध महिलेला वेदनाशामक गोळीऐवजी चुकून रक्तदाबावरील गोळी देतो, हा पटकथेचा ‘जर्म’ आहे. त्यानंतर या वयोवृद्ध महिलेचा शोध घेतानाचा प्रवास सोळा मिनिटे रंगविण्यात आला असून, हा प्रवास पडद्यावरच पाहायला हवा असा आहे. प्रत्येक क्षेत्रात मनापासून काम करणारे लोक आहेत; पण त्यांना पुरेशी साधने उपलब्ध नसतात. तरीही ती माणसे मन लावून काम करतात. अशा व्यक्तींना अमोल देशमुख आपला लघुपट अर्पण करतात.

माझा ‘औषध’ हा लघुपट कोणताही संदेश देत नाही तर केवळ संवेदना फुलवितो आणि मानवी नातेसंबंध दाखवितो. लघुपटाला थिएटरचा दुष्काळ असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लघुपट पोचविण्याचा माझा प्रयत्न आहे.
- अमोल देशमुख

Web Title: Phalantank's 'medicine' applied at the national level!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.