शिवचरित्राचा आदर्श घेऊन व्यक्तिमत्त्व विकास साधावा : प्रदीप यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:31+5:302021-06-17T04:26:31+5:30
वाई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे. त्यांच्या कार्यातून, योगदानातून बोध घेऊन आपला व्यक्तिमत्त्व विकास साधावा,’ ...

शिवचरित्राचा आदर्श घेऊन व्यक्तिमत्त्व विकास साधावा : प्रदीप यादव
वाई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे. त्यांच्या कार्यातून, योगदानातून बोध घेऊन आपला व्यक्तिमत्त्व विकास साधावा,’ असे आवाहन डॉ. प्रदीप यादव यांनी केले.
येथील किसन वीर महाविद्यालयात ‘शिवचरित्र’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
डॉ. प्रदीप यादव म्हणाले, ‘आज शिवचरित्र केवळ इतिहास या विषयापुरते आपण सीमित करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची चरित्रे विद्यार्थी फारशी वाचत नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी यांच्या ग्रंथांची गावोगावी पारायणे केली जातात. त्याप्रमाणे शिवचरित्राचे पारायण होणे आवश्यक आहे. त्यातून शिवचरित्रातील विविध पैलूंची युवापिढीला ओळख होईल व त्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधता येईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्या कारकिर्दीत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नव्हती. यावरून त्यांचे यशस्वी कृषी धोरण दिसून येते. ते खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टी कृतीत आणणारे राज्यकर्ते होते. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष भावनेने राज्यकारभार करणारे राजे होते. व्यक्तीपेक्षा गुणीजनांचा प्रशासनात समावेश, व्यवस्थापकीय कौशल्य, किल्ला, न्याय, प्रशासन, पर्यावरणीय जाणीव, जलव्यवस्थापन ही त्यांच्या लोकाभिमुख, कल्याणकारी राजनीतीची महत्त्वपूर्ण वैशिष्टे होती. ‘शिवमुद्रा’ ही तर त्यांच्या राज्यकारभाराची ध्येय-धोरणे जनतेसमोर स्पष्टपणे उलगडून दाखवते, असेही डाॅ. यादव यांनी सांगितले.
जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जे. एस. चौधरी यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने वेबिनारचे उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली तर प्रभारी प्राचार्य डॉ. ई. बी. भालेराव यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. बी. एम. बिराजदार यांनी केले. प्रा. रवींद्र बकरे यांनी परिचय करून दिला. डॉ. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले.