तांब्याच्या तारांवर माहीतगार व्यक्तीचाच डोळा
By Admin | Updated: August 24, 2014 00:32 IST2014-08-24T00:30:52+5:302014-08-24T00:32:04+5:30
लाखोंचा फटका : कंपन्यांनी काढला चोरीचा विमा

तांब्याच्या तारांवर माहीतगार व्यक्तीचाच डोळा
प्रगती जाधव-पाटील ल्ल सातारा
डोंगरमाथ्यावरील पवनचक्क्यांमध्ये असणाऱ्या तांब्याची तार सुमारे दहा लाख किमतीची असते. यामुळे आता चोरट्यांनी आपले लक्ष्य पवनचक्की पठाराकडे वळविले आहे. एका पवनचक्कीला असणारी तार चोरली तर लाखोंची कमाई होते. या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पवनचक्की कंपन्यांनी चोरीचा विमा काढला आहे. ही चोरी करताना पवनचक्की तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच पवनचक्कीविषयी सखोल माहिती असलेला व्यक्तीच ही चोरी करू शकतो.
सुरक्षारक्षक नसणे, पवनचक्की बंद असणे आणि पोलिसांचा राउंड कोणत्या वेळेत नसतो याचा अभ्यास करून ही टोळी सक्रिय होते. पठारावर विखुरलेल्या पवनचक्क्यांच्या जाळ्यात कुठे काय चालले आहे, याची माहिती घेण्यासाठी फारसं कोणी धजावत नाही. याचा फायदा घेत चोरट्यांनी पवनचक्कीला लक्ष्य केले आहे.
सोने-चांदी दुकान किंवा घरफोडी करण्यापेक्षा ही चोरी सुरक्षित आणि अधिक फायदा करून देणारी असल्याने चोरटे याकडे आकर्षित झाले आहेत. वाढत्या चोऱ्यांचे सत्र लक्षात घेता पवनचक्की कंपनीने आता पवनचक्कीचा चोरीचा विमाही करून घेतला आहे. त्यामुळे पवनचक्कीचा कोणताही भाग चोरीस गेला तर त्याची भरपाई संबंधित कंपनीला मिळू शकेल. पाते आणि मशीन यांना जोडणारी वायर दोनशे मीटर लांबीची आणि सुमारे पाचशे ते सातशे किलो वजनाची असते. (प्रतिनिधी)
सुरक्षा रामभरोसे..!
एकेका पठारावर शेकडो पवनचक्क्या उभ्या असतात. शंभर एकरावर पसरलेल्या या पवनचक्क्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे पवनचक्कींची सुरक्षा रामभरोसे अशीच असते. त्यामुळे एका टोकावर चोरी होत असेल तर त्याचा सुगावा दुसऱ्या टोकाला असणाऱ्या सुरक्षारक्षकाला नसतो. काही कंपन्यांनी एकेका सुरक्षारक्षकाला वीस-वीस पवनचक्कींची जबाबदारी दिली आहे. पण, रात्रीच्या वेळी आठ-दहा जणांच्या टोळीपुढे एकटा माणूस पुरा पडणार नाही, म्हणून सुरक्षारक्षकच चोरी होताना उघड्या डोळ्याने पाहत असतो.