पवारांनी केली म्हणे पाऊस पाण्यावर चर्चा
By Admin | Updated: July 7, 2015 22:26 IST2015-07-07T22:26:54+5:302015-07-07T22:26:54+5:30
विश्रामगृहात काहीकाळच थांबले : कऱ्हाडच्या विरंगुळ्यातही रमले कृष्णा काठच्या हवामानाचाही घेतला अंदाज

पवारांनी केली म्हणे पाऊस पाण्यावर चर्चा
प्रमोद सुकरे -कऱ्हाड --राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी खासगी दौऱ्यानिमित्त कऱ्हाडात अर्धा दिवस थांबले. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी मोजक्याच व्यक्तींबरोबर पाऊस पाण्यावर चर्चा केली म्हणे. तर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या घरी प्रितीभोजन घेऊन ते पुढच्या दौऱ्याला निघून गेले; पण पवारसाहेब नेमक्या कोणत्या पाऊस पाण्यावर बोलले. अन् प्रितीभोजन करताना त्यांनी संबंधितांना कोणत्या सूचना दिल्या, याबाबत उत्सुकता आहे.
शरद पवार व पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या गाड्यांचा ताफा मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचला. खासगी दौरा असल्याने मोजकेच शिलेदार विश्रामगृहावर स्वागताला हजर होते. आमदार बाळासाहेब पाटील, राजेश पाटील वाठारकर, देवराज पाटील, अरूण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, अॅड. विद्याराणी साळुंखे, नंदकुमार बटाणे यांच्याबरोबर चहा पित सुमारे १५ मिनिटे चर्चा केली. तेथून बाहेर पडताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला; पण ‘सध्या काही विषय अन् वातावरण नाही,’ असं म्हणत ते गाडीत बसून निघून गेले. मग चर्चेसाठी आत असणाऱ्या स्थानिक नेत्यांकडे चौकशी केली असता, पवारांनी पाऊस पाण्यावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. पावसाने अजूनही ओढ दिली तर धरणातल्या पाण्याचे नियोजन कसे करावे लागेल, असं बरंच काही; पण पवारसाहेब केवळ एवढचं बोलले असतील, यावर कोणाचा विश्वास बसू शकतो का?
चर्चेदरम्यान पवारांनी आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून ‘कृष्णा’काठच्या राजकीय हवामानाचीही माहिती घेतली. खरंतर कृष्णेच्या निवडणुकीत काय अन् कसे घडले, हे पवारांना माहित नाही असं शक्यच नाही. तरीही मग पावसाने ओढ दिली असली तरी ‘कृष्णे’च्या निवडणुकीत ‘पाऊस’ कसा पडला अन् सभासदांनी कोणा कोणाला कसे ‘पाणी’ पाजले, इथंपर्यंत सारी चर्चा झाली बरं.
विरंगुळ्यात जुन्या आठवणींना उजाळा
शरद पवारांनी प्रतिभातार्इंसोबत दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विरंगुळा या बंगल्याला भेट दिली. या स्मारकात यशवंतरावांच्या जुन्या आठवणी फोटो रूपाने मांडल्या आहेत. ते फोटो उभयता न्याहळत असताना एका फोटोसमोर त्यांचे पाय थबकले. यशवंतराव, वेणूताई अन् विठामाता या तिघांचा एकत्रित असणाऱ्या फोटोखाली ‘धन्य झाली माऊली’ असे लिहिलेले होते. तेव्हा पवारांनी प्रतिभातार्इंना सांगितले, ‘यशवंतराव जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आईला भेटायला आले. आईला आपला मुलगा कोणीतरी मोठा झालाय, हे माहित होते; पण नेमका काय झालाय हे माहित नव्हते. तेव्हा भेटीदरम्यान यशवंतरावांना आई म्हणाली तू मोठा झालास म्हणजे मामलेदारापेक्षा मोठा झालास की काय,’ अशा अनेक आठवणी सांगत ते अर्धातास विरंगुळ्यात रमले.
बाळासाहेबांघरी प्रितिभोजन
कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पवार दाम्पत्याने प्रितिभोजन घेतले. शरद पवार, प्रतिभाताई पाटील, हसन मुश्रीफ अन् बाळासाहेब पाटील यांनी जेवताना अनेक विषयावर चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान थोरल्या पवारांनी पुढील राजकीय वाटचाली संदर्भात बाळासाहेबांना काही पे्रमाच्या सूचनाही दिल्याचे समजते. त्या सूचनांचे होऊ घातलेल्या बाजार समिती निवडणुकीत पालन होताना दिसेलच.
अविनाश मोहितेंनी घेतली पवारांची भेट
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र मोहितेंनी पवारांच्या हातात एक पत्र दिले. अन् त्या पत्रावरील माहिती थोरले पवार बराच वेळ न्याहळत होते; पण त्या पत्रात काय लिहलं होतं हे त्या दोघांनाच माहित. नुकत्याच झालेल्या कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय.
अविनाश मोहिते थोरल्या पवारांना भेटण्यासाठी आले अन् दहा पंधरा मिनिटात भेटून निघून गेले; पण त्यानंतर बाळासाहेब पाटलांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांच्यात अविनाश मोहितेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा बराच वेळ सुरू होती.
विश्रामगृहातील चर्चेदरम्यान आमदार बाळासाहेब पाटील यांनी शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली असल्याचे कानावर घातले. त्याबाबत काय काय तयारी चालवलीय, याची माहिती त्यांच्या कानावर घातली. पवारांनी ती शांतपणे ऐकून घेतली एवढेच.
शरद पवार व प्रतिभातार्इंनी वेणूताई चव्हाण मारकालाही आवर्जून भेट दिली. या स्मारकात यशवंतराव व वेणूताई या दोघांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करून ठेवले आहे. त्याचीही पाहणी बराचवेळ केली.