खचलेला तापोळा रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:57+5:302021-09-11T04:40:57+5:30
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणारा खचलेला रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पालिकेच्या मार्फत ...

खचलेला तापोळा रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणारा खचलेला रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पालिकेच्या मार्फत लक्ष घालून या भागातील ग्रामस्थांची गैरसोय केली दूर केली आहे.
महाबळेश्वरहून तळदेव, तापोळ्यासह अनेक मुख्य गावांना व काही मुख्य हॉटेलांकडे जाणारा येथील विसर्जन विहिरीजवळील रस्ता जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे खचला होता. येथून जाणारी वाहतूक अचानक बंद झाली होती. तळदेव, तापोळा, मांघर, येरणेसह या परिसरातील अनेक गावांतील शेतकरी चाकरमानी रोज महाबळेश्वरला कामानिमित्त ये-जा करीत असतात. महाबळेश्वरपासून या भागात जाण्यासाठी हा एकमेव मुख्य मार्ग असल्याने हा रस्ता खचून बंद पडल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. सध्या गणपतीचा उत्सव असल्याने मुंबई, पुण्याहून श्रींची प्रतिष्ठापना करण्यासाठी गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी वाहतुकीची मोठी समस्या येथे निर्माण झाली असल्याने मोठी समस्या येथे ‘आ’ वासून समोर उभी ठाकली होती.
अरुंद रस्ता व अतिशय तीव्र वळणांमुळे मोठ्या वाहनांना येथून वाहतूक करताना मोठा त्रास होत होता. अनेकवेळा तीव्र वळणांमुळे वाहने मागेपुढे करतानाही उतार व चढ असल्याने त्रास सहन करावा लागत होता. वाहतुकीत बराच वेळ जात होता तर काही वेळा वाहतुकीचा खोळंबा होत होता. गेल्यावर्षी विसर्जन विहिरीजवळील रस्ता खचल्याने काही काळ येथील वाहतूक बंद झाली होती. त्यावेळी येथील हॉटेल व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन जलदगतीने रस्ता सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर वर्गणी काढून रस्ता सुरू केला होता. परंतु यावेळी रस्ता जास्त प्रमाणात खचल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यात सध्या येथील पालिकेतील राजकारण तापल्याने व नगराध्यक्ष गट व तेरा नगरसेवकांचे मतभेद विकोपाला गेल्याने पालिकेतील कोणताही निर्णय होत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
चौकट
नऊ ट्रक, डंपरचा वापर
अवघड परिस्थितीत येथील मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा व मुख्याधिकारी या दोन्ही भूमिका सांभाळत हा रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करता आली. सुमारे नऊ ट्रक, डबर याठिकाणी उतरवून खचलेला रस्ता भरून घेऊन मुसळधार पावसात युद्धपातळीवर काम करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात त्यांना यश आले आहे. या रस्त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
फोटो १०तापोळा रोड
महाबळेश्वरमधून तापोळ्याकडे जाणारा रस्ता जुलै महिन्यातील पावसाने खचला होता. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पाहणी करून तो शुक्रवारपासून हलक्या वाहनांसाठी खुला केला. (छाया : अजित जाधव)