स्वातंत्र्यदिनी घडलं देशभक्तीचं दर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:46+5:302021-08-15T04:39:46+5:30
देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अनेकांचं रक्त सांडलं, काहींना घरेदारे सोडून भूमिगत व्हावं लागलं, ...

स्वातंत्र्यदिनी घडलं देशभक्तीचं दर्शन !
देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अनेकांचं रक्त सांडलं, काहींना घरेदारे सोडून भूमिगत व्हावं लागलं, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्याचा दिवस उगवला. या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वाई नगरीत अभूतपूर्व असा साजरा झाला. त्यासाठी मुलांनी रात्रभर कमानी उभारल्या होत्या, रस्ते स्वच्छ केलेले. १५ ऑगस्ट १९४७च्या सकाळी वाईतील भाजी मंडईत झेंडा वंदनाचा कार्यक्रम शेकडोंच्या उपस्थितीत झाला अन् देश गुलामगिरीतून मुक्त झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले, अशा आठवणी प्रा. संभाजीराव पाटणे यांनी जागविल्या.
मूळचे वाई येथील प्रा. संभाजीराव पाटणे हे सध्या साताऱ्यात वास्तव्याला आहेत. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९३६मध्ये झाला. सुरुवातीची अनेक वर्षे त्यांनी वाईत काढली. तेथेच त्यांनी देश स्वतंत्र झाला तो दिवस पाहिला. देश स्वतंत्र झाला तेव्हा ते ११ वर्षांचे होते. वाईतील ११ नंबरच्या शाळेत पाचवीमध्ये शिकत होते. वाईमध्ये स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्र सेवा दलाची शाखा भरत होती. त्यात ते जात होते. ३० ऑगस्ट १९४४ला त्यांचे वडील सखाराम बळवंत पाटणे हे महात्मा गांधीजींना पाचगणीवरून वाईत घेऊन आले होते. त्याठिकाणी त्यांना प्रथम महात्मा गांधी यांचे दर्शन झाले. त्यांची प्रार्थना एकायला मिळाली. तर ब्राह्मो समाज संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पाहता आले. राष्ट्र सेवा दलात त्यांना राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य, पारतंत्र्याची भूमिका, इंग्रजांची गुलामगिरी, पारतंत्र्याचे तोटे समजून आले.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संभाजीराव पाटणे हे ११ वर्षांचे होते. देश स्वतंत्र होत असल्याचा आनंद त्यांना व त्यांच्या मित्रांना झाला होता. मध्यरात्री बाराच्या सुमारास देशाला स्वातंत्र्य मिळणार होते. तेव्हा त्यांनी ते राहात असलेल्या परिसरात कमानी उभारल्या. त्यासाठी अशोक व आंब्याच्या झाडाची पाने कमानीला लावण्यात आली होती. तसेच मुलांनी व ग्रामस्थांनी गावातील रस्ते स्वच्छ केले. सर्वत्र रांगोळी काढण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी सकाळी भाजी मंडई याठिकाणी झेंडावंदन कार्यक्रम झाला.
या झेंडावंदन कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक अप्पाशास्त्री सोहनी, काकासाहेब देवधर, रामभाऊ मेरूरकर, शंकरराव जेजुरीकर तसेच स. ब. पाटणे हे उपस्थित होते. त्यावेळी शाळेतील मुलांना लिमलेटची गोळी, चॉकलेट आणि बिस्किटे देण्यात आली. हे सर्व एक - दोन नाही तर खिशे भरून वाटण्यात आले. त्याचबरोबर तेथे बिल्लेही विकायला आले होते. त्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चित्र होते. त्यावेळी एक आणि दोन आण्याला बिल्ला मिळत होता. त्याचवेळी वाईमध्ये सामुदायिकरित्या जिलेबी तयार करुन ती वाटण्यात आली, अशी आठवणही संभाजीराव पाटणे यांनी जागवली. तरीही आजची परिस्थिती पाहून त्यांना कुठेतरी खंत वाटत असल्याचेही दिसून आले.
प्रतिक्रिया :
उदात्त स्वरूपाचा ध्येयवाद, अमर्याद कर्तृत्व, समर्पण वृत्ती, देशभक्तीची भावना, ऐक्य, एकात्मता, मानवता, परस्पर सामाजिक समन्वय याला जागृत करण्यासाठी भारतीय लोक जीवन आनंदी व्हावे म्हणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होते. तर छत्रपती शिवरायांनी माणसाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. या ज्योतीने स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात ही प्रेरणादायी वृत्ती उपयुक्त ठरली. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी या देशभक्त तरुणांमध्ये चेतना निर्माण झाली. देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मनामध्ये कोणते विचार येत आहेत, काय करायला हवे, काय घडते यावर शांत चित्ताने विचार करण्याची आता वेळ आली आहे.
- प्रा. संभाजीराव पाटणे
फोटो मेल .. १४ संभाजीराव पाटणे सातारा हाफ फोटो...
- नितीन काळेल
.........................................................................