पाटणला मेहुण्याचा गळा दाबून खून

By Admin | Updated: September 2, 2014 23:46 IST2014-09-02T23:46:25+5:302014-09-02T23:46:25+5:30

पाटणच्या ग्रामीण रूग्णालयासमोर घडली घटना

Patan's brother's blood thrills | पाटणला मेहुण्याचा गळा दाबून खून

पाटणला मेहुण्याचा गळा दाबून खून

पाटण : बहिणीला वारंवार मारहाण का करता, असा जाब विचारणाऱ्या मेहुण्याचा एकाने गळा दाबून खून केला. मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विलास विश्वास जाधव (वय २५, रा. विक्रमनगर, पाटण) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश परसू पवार (रा. विक्रमनगर, पाटण) याला अटक केली आहे. प्रकाश पवार हा पत्नी उमा हिच्यासह विक्रमनगरमध्ये राहतो. त्याच परिसरात उमाचा भाऊ विलास व इतर कुटुंबीय वास्तव्यास आहेत. प्रकाशला दारूचे व्यसन असून तो वारंवार उमाला शिवागाळ करायचा. तसेच दमदाटी करीत मारहाण करायचा. उमाच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर भाऊ विलास भांडणे सोडविण्यासाठी तीच्या घरी जायचा. बहिणीला मारहाण केल्याबाबत तो प्रकाशला जाब विचारायचा.
मंगळवारी सायंकाळी प्रकाश मद्यप्राशन करून घरी आल्यानंतर त्याने उमाला मारहाण केली. या मारहाणीत ती जखमी झाल्यामुळे तिची आई तिला घेऊन उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयाकडे गेली. त्यावेळी विलासही त्यांच्यासोबत होता. तिघेही ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात पोहोचले असतानाच प्रकाश त्या ठिकाणी आला. त्याने पुन्हा उमाशी वाद घालण्यास सुरूवात केली. विलासने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यालाही दमदाटी व शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. मारामारीवेळी प्रकाशने विलासचा गळा दाबून खून केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास धस यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्रकाशला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. घटनेची नोंद पाटण पोलिसात झाली आहे. निरीक्षक विकास धस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Patan's brother's blood thrills