पाटणकरांची म्हणे गुंडगिरी, देसार्इंचे भाडोत्री वासुदेव हरी
By Admin | Updated: August 18, 2014 21:35 IST2014-08-18T21:13:06+5:302014-08-18T21:35:25+5:30
पाटण तालुका : आरोप-प्रत्यारोपाला उधाण

पाटणकरांची म्हणे गुंडगिरी, देसार्इंचे भाडोत्री वासुदेव हरी
पाटण : विधानसभा निवडणूक कधी लागतेय आणि आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात कशी पडेल, यासाठी पाटणच्या दोन्ही नेत्यांनी चांगलेच मनावर घेतल्याचे दिसत आहे. म्हणूनच पाटणकर व देसाई गटांकडून एकमेकांवर नवनवीन आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
‘पाटणकरांना तालुक्यात गुंडगिरी करून निवडणूक जिंकायची आहे,’ असा आरोप देसार्इंनी मूळगावच्या सभेत केला. तसेच युवा संघटनेकडून पत्रक काढून पाटणकरांनी गुंडांची भरती केल्याचे म्हटले आहे. याउलट देसाई, आता फुकणीचा वापर करू लागले आहेत आणि तालुक्यात भाडोत्री वासुदेव आणून मला आमदार करा, असे सांगू लागल्याची टीका आमदारांनी व राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी केल्यामुळे निवडणुकीपूर्वी आरोपांचे फटाके वाजू लागले. बनावट व भाडोत्री वासुदेव आणून तालुक्यात आध्यात्मिक परंपरा व धार्मिक भावना बिघडविली जात असल्याचा आरोप देसार्इंच्याबाबत झाल्यामुळे तालुक्यात हे काय आणखी नवीन अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकीकडे शक्ती आणि दुसरीकडे भक्ती अशी पाटणच्या राजकारणाची गत झालेली दिसत आहे. आगामी काळात कोण कशाचा वापर करतंय, हे मतदारांना दिसणार आहे. (प्रतिनिधी)
मतदारांना गुंडगिरी आणि वासुदेव हरी चालत नाही
पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ, इतरांच्या मानानं इथली माणसं साध्या राहणीमानाची. मात्र पुण्या-मुंबईत जाऊन गुन्हेगारी जगतात अनेकांची ‘हिटलिस्ट’मध्ये नोंद आहे. मात्र, पाटण तालुक्याच्या राजकारणात कधीही गुंडगिरी चाललेली नाही. हे नेत्यांनाही ज्ञात आहे. देसाई गणेशाचे भक्त आणि पाटणकर श्रीरामाचे आहेत. त्यामुळे भक्ती चालते मात्र शक्ती नाही. चालते ते फक्त लोकशक्ती.