पुसेगाव बैलगाडी शर्यतीचे भवितव्य धोक्यात
By Admin | Updated: December 16, 2014 00:03 IST2014-12-15T22:35:23+5:302014-12-16T00:03:29+5:30
कोरेगावच्या गुन्ह्यामुळे संभ्रम : परवानगी मिळविण्यासाठी यात्रा कमिटीसह मान्यवरांची धावपळ सुरू

पुसेगाव बैलगाडी शर्यतीचे भवितव्य धोक्यात
केशव जाधव - पुसेगाव -श्री सेवागिरी यात्रेचे मुख्य आकर्षण हे बैलगाड्यांच्या शर्यती असते. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी येत असतात. मात्र, रविवारी कोरेगाव येथे बैलगाडी शर्यत संयोजकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पुसेगाव यात्रेतील बैलगाड्या शर्यतींचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बैलगाड्यांच्या शर्यती भरवाव्यात किंवा नाही, यासंदर्भात राज्यात विविध मतप्रवाह आहेत. गेल्या वर्षीही बैलगाड्यांच्या शर्यतीवर शासनाने बंदी घातली होती. मात्र, श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा तोंडावर आली असतानाच अचानक बंदी उठली आणि यात्रेत ठरल्याप्रमाणे शर्यती पारही पडल्या. हाच प्रकार त्यापूर्वीही अनेकदा झाला होता.
यावर्षीही शासनाची शर्यतीवरील बंदी कायमच राहिली होती; पण काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्रालयामार्फत या शर्यतींवरील बंदी शिथील केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या अन् कोरेगाव भागात बैलगाडी शर्यती भरवल्याबाबत संयोजकांवर गुन्हा दाखल झाला.
पुसेगाव यात्रेत बैलगाड्यांच्या शर्यती न पाहण्याचा योग कधीच आला नाही; पण यावर्षी काय होणार? याविषयी चर्चा रंगायला लागल्या आहेत.
व्यावसायिकीतून भरवलेला बैलगाड्यांचा बाजार आणि यात्राकाळात होणाऱ्या शर्यती यात फरक आहे. पुसेगावच्या बैलगाडी आखाड्याच एक नंबरचे बक्षीस पटकाविणाऱ्या बैलजोडीला मोठा मान मिळतो; पण त्यांची किमत ही चांगलीच वाढलेली असते.
या जातिवंत,चपळ बैलांची पैदास करणाऱ्या देशी खिलार गाईला त्यामुळे तर शेतकरी वर्गात चांगली मागणी असते. शर्यतीवर बंदी येत असल्याने देशी गार्इंची मागणी कमी होऊ लागली होती.
खटाव तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांकडे मुंबई, कल्याण, डोंबविली येथील बैलगाडी शौकिनांची खोंडे जोपासण्यासाठी ठेवलीही जातात. त्यासाठी त्यांचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याला रोजगारही मिळत होता. पोटच्या मुला इतकी मेहनत या खोंडाच्या देखभालीसाठी घेतली जाते. बंदीमुळे शेतकऱ्यांच्या हौसेला मर्यादा पडल्या आहेत. शर्यती पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो शौकीन पुसेगावात येतात. त्या दिवशी लाखोंची उलाढाल होते. बैलगाडींचे मालक कित्येक दिवस मेहनत घेत असतात.
काही अटींवर का होईना शर्यतीवरील बंदीबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बैलगाडी शर्यती आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली तर खऱ्या अर्थाने जातिवंत खिलार जनावरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
- विजय जाधव, विश्वस्त, सेवागिरी देवस्थान
पुसेगाव यात्रेतील मैदानापूर्वीच बैलगाडी शर्यत भरविण्याचा परवाना मिळावा. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत चर्चा होणार आहे.
- धनाजी शिंदे, प्रमुख, बैलगाडी शर्यती कृती समिती
बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी विविध राज्यांतून प्रयत्न सुरू आहेत. तामिळनाडू, हरियाणा व पंजाबमधील असंख्य खासदारांनी तशी मागणीही केली आहे. पुसेगावच्या बैलगाडी शर्यतीचे मैदान भरवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्नशील आहोत.
- आनंदा पैलवान,
बैलगाडी शौकीन, रेठरे बुद्रुक