शाळेच्या फीसाठी पालकांचे सुवर्णतारण कर्जाचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:33+5:302021-04-08T04:39:33+5:30

प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या निमित्ताने लॉकडाऊनची परिस्थिती उद्‌भवल्यानंतर सामान्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडले आहे. ...

Parent's gold deposit loan application for school fees | शाळेच्या फीसाठी पालकांचे सुवर्णतारण कर्जाचे अर्ज

शाळेच्या फीसाठी पालकांचे सुवर्णतारण कर्जाचे अर्ज

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या निमित्ताने लॉकडाऊनची परिस्थिती उद्‌भवल्यानंतर सामान्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडले आहे. हाती येणाऱ्या पगारातून दैनंदिन गरजा भागविणेच मुश्कील झालेल्या पालकांनी लेकरांची फी भरण्यासाठी चक्क सोने गहाणवट टाकण्यासाठी खासगी आणि सराफी पेढ्यांमध्ये कर्ज घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कुटुंबावरील अत्यंत बाका प्रसंग आल्यानंतरच हक्काची आणि सुरक्षित गुंतवणूक असणारे सोनं शालेय शिक्षणासाठी पहिल्यांदाच कर्ज स्वरूपासाठी आलं असल्याचे सराफी व्यापारी सांगतात.

मार्च २०२०पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक कुटुंबाची आर्थिक कोंडी झाली. दोन पगार असलेल्या कुटुंबात एकाची नोकरी गेली, तर दुसऱ्याचा पगार कपात झाला. लॉकडाऊन काळात उत्तम व्यवसाय चालणाऱ्यांचे धंदे पडले, परिणामी पगार, वीजबिल, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जासाठीचे हप्ते याची भर पडत गेली आणि देणेकरांची संख्या वाढून तो एक मोठा आकडा वाढला. या संघर्षातून बाहेर पडत असतानाच न्यू नॉर्मलच्या नावाखाली नोकरदार आणि व्यावसायिकांची घडी दिवाळीत बसतेना बसते तोवर पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागला आणि येरे माझ्या मागल्या अशी स्थिती निर्माण झाली. वर्षभर मुलांच्या अभ्यासापेक्षा जगणं महत्त्वाचं ठरवून पालकांनी मुलांना शक्य होतं तेवढं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण घरात दोन वेळचं अन्न शिजवायचं की मुलं शिकवायची अशी परिस्थिती कुटुंबावर आली आहे.

पाल्याला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून कुवतीपेक्षा थोडा मोठा घास घेणाऱ्या पालकांच्या गळ्याशीच आता सगळं आलं आहे. शाळेतून येणारे मेसेज आणि फोनला उत्तरं देतादेता थकलेले पालक बघणं मुलांना त्यांच्याच नजरेत दोषी बनवतंय. काहीही झालं तरी शाळा फी वाढ केली नाही, अभ्यासक्रम पूर्ण संपवला, आम्हालाही यंत्रणांचा खर्च आलाच की, या सबबी देत आहे. शाळेबरोबर संघर्ष करून मुलाचे शैक्षणिक वर्ष आणखी अडचणीत आणण्यापेक्षा पालकांनी आता सोनं गहाण टाकून कर्ज काढण्याचा निर्णय घेतला.

चौकट :

सोने गहाण ठेवण्याकडे कल

बाजारात एक तोळ्याचा दर ४२ हजार रुपये इतका आहे. सोनं गहाण ठेवताना एक तोळ्याच्या दागिन्याच्या बदल्यात अवघे २५ हजार रुपये मिळतात. त्यानंतर पालकांनी त्यांच्या सोयीने हे दागिने पूर्ण रक्कम भरून सोडवायचे. दरमहा दागिन्यांच्या मोबदल्यात व्याज भरून पालकांनी दागिने जपायचे. कोरोनाची परिस्थिती किती दिवस अशी राहील आणि पुढं किती दिवसात संसाराची आर्थिक घडी सुधारेल याबाबत मोठं प्रश्‍नचिन्ह समोर असताना निव्वळ मुलांना शाळेने त्रास देऊ नये या एकाच भीतीने पालक हे कर्ज काढत असल्याचे दिसते.

कोट :

घराचं बांधकाम, आजारपण, तातडीची मदत किंवा मग अगदी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पूर्वी सोने गहाण ठेवण्याचा कल होता. गेल्या काही वर्षांत तर वैद्यकीय आणि गृहबांधकामासाठीच सोने मोडणाऱ्यांची संख्या अधिकची होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे मूल्यांकन करून द्यायला येणाऱ्यांमध्ये सोने गहाण टाकणाऱ्यांची संख्या वाढती दिसतेय. याचं कारण शाळेची फी भरायची असल्याचे पालक सांगत आहेत.

-पंकज नागोरी, सराफी व्यावसायिक, सातारा

कोट :

शैक्षणिक संस्था या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवाव्यात असं आहे. मात्र, काही अपवादवगळता शाळा या पैसे कमविण्याचे आणि हमखास मोठा नफा मिळवून देण्याचा व्यवसाय बनलाय. शाळा व्यवस्थापन मुलांचे हाल करू शकते, याची धास्ती पालकांच्या डोक्यात इतकी बसलीये की ते जाहीरपणे शाळेकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचीही चर्चाही करायला धजवत नाहीत. हा पालकांवर होणारा अन्यायच आहे.

-प्रशांत मोदी, सातारा जिल्हा पालक संघ

Web Title: Parent's gold deposit loan application for school fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.