पालकांचे डोळे खाडकन उघडले..आहारी गेल्याचे नाही समजले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:50+5:302021-09-05T04:43:50+5:30

सातारा : तसं पाहिलं तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्याचे दुष्परिणाम लगेच भोगावे लागत नसले, तरी त्याच्या ...

The parents' eyes opened wide..I didn't understand that the food was gone! | पालकांचे डोळे खाडकन उघडले..आहारी गेल्याचे नाही समजले!

पालकांचे डोळे खाडकन उघडले..आहारी गेल्याचे नाही समजले!

सातारा : तसं पाहिलं तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्याचे दुष्परिणाम लगेच भोगावे लागत नसले, तरी त्याच्या परिणामांची वेळ मात्र निश्चितच येते. अशाचप्रकारे वाईट वेळ सध्या ऑनलाईन गेमचा अतिरेक झालेल्या किशोरवयीन मुलांवर आलीय. ऑनलाईन शिक्षण घेता-घेता ही मुले कधी ऑनलाईन गेमच्या आहारी गेली, हे मुलांना तर समजलेच नाही; शिवाय मुलांचे पालकही अनभिज्ञ राहिले. जेव्हा मुलांच्या वागण्यात बदल दिसू लागला, तेव्हाच पालकांचे डोळे खाडकन उघडले; पण तोपर्यंत वेळ निघून गेली.

ज्या पालकांनी मुलाच्या वागण्यातील बदल वेळीच हेरला, त्या मुलांना ऑनलाईन गेमच्या अतिरेकामधून बाहेर काढता आलं; पण ज्यांची मुलं या ऑनलाईन गेमच्या आहारी गेली, त्यांना मात्र बाहेर काढता आले नाही. परिणामी एकेक जीव आता या अतिरेक ऑनलाईन गेमच्या माध्यमातून जाऊ लागलाय. साताऱ्यातील श्रीधर इंगळे या नववीतील मुलाने फ्री फायर गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच सातारा शहरात घडलीय. या घटनेमुळे ऑनलाईन गेमचा अतिरेक किती होतोय, हे समोर येतंय. या घटनेमधून इतर पालकांनी नक्कीच बोध घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे शिक्षण पद्धतीतच बदल झाला; पण हा बदल स्वीकारत असताना मुलांच्या आयुष्यावरही मोठे दुष्परिणाम झालेत. कोवळ्या वयातच मुलांच्या हातात हवी ती माहिती आली. काहींनी याचा चांगला उपयोग केला; पण काही मुलांनी फावला वेळ ऑनलाईन गेममध्ये घालवलाय. त्या मुलांची सवय आता जाता जात नाही. ऑनलाईन गेम खेळल्याशिवाय या मुलांना चैन पडत नाही, अशी मुले सदैव बेचैन, अस्वस्थ असतात. अशा परिस्थितीत जर मुलाकडील मोबाईल काढून घेतला, तर तो मुलगा टोकाचे पाऊल उचलू शकतो. अशी अनेक पालकांना धास्ती वाटतेय. मुलांच्या अशाप्रकारच्या वागण्याचा पालकांना नाहक त्रास होऊ लागलाय. यामुळे अनेक पालक मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेऊ लागलेत. आमच्या मुलाला यातून बाहेर काढा, अशी पालक मानसोपचार तज्ज्ञांकडे याचना करत आहेत. रोज आठ ते दहा मुलांना घेऊन पालक मानसोपचार तज्ज्ञांकडे येत आहेत. यातील काही मुलांचा ऑनर्ज्इन गेमचा अतिरेक झाला आहे. शिवाय काही मुलांना अश्लील चित्रफीत पाहण्याचीही सवय लागली आहे. मोबाईल काढून घ्यावा, तर त्यांचे ऑनलाईन शिक्षण कसे व्हायचे, हा ही प्रश्न पालकांसमोर आहे. त्यामुळे यातून या मुलांना बाहेर काढण्यासाठी आता सारी भिस्त मानसोपचारतज्ज्ञ यांच्यावरच पालकांनी सोपवलीय.

चौकट : पालक हतबल...

अनेक मुलांचे आई-वडील नोकरी करतात. मुले दिवसभर घरात एकटी असतात. ऑनलाईन तास झाल्यानंतर मुलांना वेळच वेळ असतो. त्यांना अभ्यास कर म्हणायला घरात कोणी नसल्यामुळे मग ही मुले मोबाईलमध्ये डोकावून बसतात. तासन तास मोबाईलमध्ये डोकावल्याने मुलांमध्ये बधिरता आल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगताहेत. या एकटेपणाचा मुलांकडून गैरवापर होऊ लागलाय. अनेक मुले ऑनलाईन गेमच्या आहारी गेलीत. ज्यांचे पालक घरात नसतात, याच मुलांचा वेळ सर्वाधिक मोबाईल गेम खेळण्यात जात असून, नोकरी करणारे पालक अक्षरशः हतबल झाले आहेत.

Web Title: The parents' eyes opened wide..I didn't understand that the food was gone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.