‘मास्क’वर अवतरले पॅनलचे झेंडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:34+5:302021-06-20T04:26:34+5:30

भारतीय लोकशाहीत निवडणुकींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निवडणुका म्हटलं की, प्रचार आलाच; पण कालपरत्वे प्रचार पद्धतीत, प्रचार साहित्यात बदल घडलेले ...

Panel flags on 'Mask'! | ‘मास्क’वर अवतरले पॅनलचे झेंडे!

‘मास्क’वर अवतरले पॅनलचे झेंडे!

भारतीय लोकशाहीत निवडणुकींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निवडणुका म्हटलं की, प्रचार आलाच; पण कालपरत्वे प्रचार पद्धतीत, प्रचार साहित्यात बदल घडलेले दिसताहेत. बदल हा तर निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे ते स्वीकारले जात आहेत. प्रत्येक निवडणुकीत प्रचार पद्धतीत किंवा प्रचार साहित्यात बदल दिसून येतात. कृष्णाच्या निवडणुकीत आज अनेक प्रकारचे प्रचार साहित्य उपलब्ध आहे; पण सध्या मास्कला मोठी मागणी दिसत आहे.

पूर्वीच्या काळी प्रचार चालत, सायकलवरून, बैलगाडीने होत होता. यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांचे प्रचारादरम्यान बैलगाडीतून स्वागत केल्याचे जुने दाखले अनेक जण देतात; पण त्यांनी स्थापन केलेल्या साखर कारखान्यांमुळे इथल्या शेतकऱ्याकडे एवढी सुबत्ता आली आहे की, तो आता प्रचार बैठकीलाही चारचाकी गाडीतून जाताना दिसतोय. आता हातात नव्हे, तर त्याच्या गाडीला झेंडा दिसतोय.

कृष्णाच्या निवडणुकीत यापूर्वी ट्रॅक्टर, ट्रकमधून प्रचार असायचा. ‘हलगी अन्‌ घुमकं काय म्हणतंय..’ या घोषणांच्या आरोळ्या कानठळ्या बसवायच्या. हातात घेतलेला झेंडा कार्यकर्ता गावभर फिरवायचा; पण सध्याचा कार्यकर्ता गळ्यात मफलर अन्‌ ‘भरलेल्या’ खिशाला पॅनलच्या निशाणीचा बिल्ला लावून मिरवताना दिसतोय. पूर्वी प्रचारासाठी भिंती रंगविल्या जात होत्या, नंतर कापडी फलक आले; पण आता फ्लेक्स झळकताना दिसत आहेत. ते लावायला कार्यकर्त्यांना कुठलीही तसदी दिसत नाही, त्याचं अगोदरच टेंडर दिलेलं दिसतंय. (आता कारखाना म्हटलं की टेंडर आलेच)

पूर्वी प्रचाराला जाताना कार्यकर्ते घरातून शिदोरी घेऊन जात असे म्हणे! आता काळ बदलला आहे. ‘रिकाम्या पोटाने कार्यकर्ता समाधानकारक प्रचार करू शकत नाही’ हे पुढाऱ्यांनासुद्धा चांगलेच पटलेले दिसते. त्यामुळे जेवणावळीचा प्रकार सुरू झालाय. मोठमोठ्या पंगती अगोदर पडत होत्या. पुन्हा ढाबा संस्कृती आली; पण सध्या कोरोनाच्या निर्बंधामुळे त्याला भलत्याच मर्यादा आल्या आहेत. तरीही नियम ‘धाब्यावर’ बसवून अनेक जण मार्ग काढतात बरं .. आता ते निर्बंध शिथिल झाल्यावर गर्दी उसळणार, हे निश्चित.

‘दारू’मुळे समाजाचा ‘दारुण’ पराभव होतो असं भाषणात अनेकांकडून सांगितलं जातं; पण कुठलीच निवडणूक त्याच्याशिवाय होताना दिसत नाही. कृष्णाच्या निवडणुकीतसुद्धा ‘चोरी चुपके’ हा प्रकार सुरूच आहे; पण त्याबरोबरच कार्यकर्त्यांना खुलेआम बाटलीही दिली जात आहे बरं, पण ती बाटली ‘हँडसॅनिटायझर’ची दिसते एवढंच. आता या धामधुमीतही नेत्यांना कार्यकर्त्यांची काळजी दिसतेय म्हणायची.

प्रमोद सुकरे, कराड

Web Title: Panel flags on 'Mask'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.