पावसासाठी पंढरीनाथाचा ‘सोशल’ धावा!

By Admin | Updated: July 18, 2015 00:34 IST2015-07-17T21:52:26+5:302015-07-18T00:34:51+5:30

‘अँड्रॉइड’वारीत गजर : दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाचं दु:ख होतंय ‘शेअर’

Pandharranatha 'social' runs for rain! | पावसासाठी पंढरीनाथाचा ‘सोशल’ धावा!

पावसासाठी पंढरीनाथाचा ‘सोशल’ धावा!

राजीव मुळये - सातारा -डोंगरदऱ्यांची हिरवाई मागे टाकून माउलींची वारी आता रखरखीत माळावर आली. पाभरीवरची मूठ काढून हाती टाळ घेतलेल्या शेतकरी-वारकऱ्यांनी वावराची चिंता विठुरायाच्या खांद्यावर सोपवून भक्तीची ध्वजा खांद्यावर घेतलीय. याच वेळी अन्नदात्याबद्दल कृतज्ञ असलेला ‘शहरी अँड्रॉइड संप्रदाय’ पावसासाठी पंढरीनाथाला ‘सोशल साकडं’ घालू लागलाय.
पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळं राज्यातला बहुतांश शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडलाय. पण रानातली चिंता रानात ठेवून लाखोंच्या संख्येनं शेतकरी टाळ-मृदंगाच्या संगतीत लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीची वाट चालतायत.
रुसलेल्या पावसाची समजूत आता विठ्ठलच घालेल, अशी गाढ श्रद्धा असल्यामुळं शेतकऱ्याला आता विठूमाउलीच्या खांद्यावर डोकं ठेवण्याखेरीज पर्याय दिसत नाहीये.
सामान्यत: अशा वेळी ‘माझा काय संबंध’ अशा अलिप्तपणानं वावरणारा शहरी मध्यमवर्ग आता सोशल मीडियामुळं बराच संवेदनशील झाल्याचं पाहायला मिळतंय. पंढरीची वारी आणि दुष्काळाचं संकट याचा मेळ घालून तयार केलेले परिच्छेद, कविता ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून फिरू लागल्यात.
पाऊस हाच एकमेव आधार असलेल्या शेतकऱ्यावर पाऊस रुसला तर त्याच्या काळजाचं काय होत असेल, याची जाणीव दरमहा मोजून पगार घेणाऱ्यांच्या मनात मूळ धरू लागलीय.
तंत्रज्ञानानं प्रगती साधली, उपभोग्य वस्तूंचं विक्रमी उत्पादन झालं, शेअर बाजारानं उच्चांक गाठला, तरी जगण्यासाठी अन्नच पाहिजे. त्यासाठी शेती आणि शेतकरी जगला पाहिजे, असा आशय असलेले संदेश दिले-घेतले जात आहेत.
पावसासाठी पांडुरंगाचा धावा करणाऱ्या आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणाऱ्या कवितांना तर उधाण आलंय. या निमित्तानं पालखीमार्गाबरोबरच भक्तीचा महापूर ‘सोशलमार्गा’वरूनही खळाळून वाहू लागलाय.

आभाळ चोरीला गेलं, त्याची गोष्ट!
शेतावरचं आभाळ चोरीला गेल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकऱ्याची गोष्ट सध्या खूप फिरतेय. आभाळ चोरीला गेल्यापासून कुणी उधार देत नाही, घरात खायला काही नाही, असं शेतकरी फौजदाराला सांगतो. पण ही विचित्र तक्रार फौजदार नोंदवून घेत नाही. अखेर वैतागून तो शेतकऱ्यालाच ‘आत टाकण्याची’ धमकी देतो. शेतकरी म्हणतो, ‘थांबा साहेब. माझ्या बायको-पोरांना बोलवून घेतो. सगळ्यांनाच जेलमध्ये टाका. तिथं आम्हाला खायला तर मिळेल ना?’

काळ्या ढगांवर देवा
‘क्लिक’ कर ना ‘माउस’
आमच्या पृथ्वीवर आता
पाड ना धो-धो पाऊस
पृथ्वीच्या ‘स्क्रीन’वर देवा
सिमेंटच्या जंगलांचा कहर
बदलून दे ना आता
हिरवागार ‘स्क्रीन सेव्हर’
ॠतुचक्राचे ‘सॉफ्टवेअर’
देवा करून घे ‘अपडेट’
नाही तर उन्हाळ्यात गारा
अन् पावसाळ्यात ऊन थेट
जास्त पाणी साठवण्यात
‘हार्डडिस्क’ची वाढवून घे जागा
पावसासाठी आम्हाला का
करावा लागतो त्रागा?
समुद्री वादळांचा धोका
मान्सूनला नेतो पळवून
त्यांचा बंदोबस्त कर तू
‘अँन्टी व्हायरस’ चालवून
पाऊस झटपट पाडण्या
देवा, वाढवून घे ‘रॅम’
नाहीतर म्हणावे लागेल
आम्हाला ‘हे राम’
देवा ‘इंजिनिअर’ बोलावून
‘सिस्टम अपग्रेड’ करण्यास सांग
नाहीतर पावसावाचून आमचे
जगणे व्हायचे ‘हँग...’

अशी चिंता... अशा कविता
नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे
फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे
कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू
ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू

Web Title: Pandharranatha 'social' runs for rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.