‘पार्किंग’चे गांभीर्य पालिकेला उमजले!
By Admin | Updated: August 18, 2014 23:24 IST2014-08-18T21:45:02+5:302014-08-18T23:24:34+5:30
वाहतूक समस्या : सातारा पालिकेच्या एकाच सभेत सहा ठिकाणचे प्रश्न मार्गी

‘पार्किंग’चे गांभीर्य पालिकेला उमजले!
सातारा : शहरातील पार्किंगची समस्या हे एक दुखणेच आहे. वाहनांची संख्या वाढतेय तशी रस्ते अपुरे पडू लागले आहेत. यावर पालिकेने उपाय काढला असून, शनिवारी झालेल्या सभेत शहरातील विविध ठिकाणचे पार्किंगचे प्रश्न मार्गी लावले आहेत. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. रविवार पेठेतील सि. स. नं. ५०७ ही जागा शासनाकडून पार्किंगसाठी मागणे, सोमवार पेठेतील डॉ. जवाहर मुनोत चौक ते न्यू इंग्लिश स्कूलअखेर सम-विषम पार्किंग करणे, पै चौक ते ५०१ पाटी अखेर सम-विषम तारखांना पार्किंग करणे, पालिका मुख्य इमारतीलगत भराव टाकून पार्किंगची सोय करणे, शनिवार पेठेतील ८६७ ही जागा पार्किंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मागणे, असे विषय या सभेत मंजूर करण्यात आले.
दिवसेंदिवस पार्किंगची समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने टाकलेले हे आश्वासक पाऊल आहे. पार्किंग समस्या ही मूलभूत समस्या बनली आहे. अजूनही पालिकेने बांधलेल्या शॉपिंग सेंटर्सच्या पार्किंगचा वापर होताना दिसत नाही.
राजवाडा परिसरात नो पार्किंग झोन तयार करण्याची गरज आहे. चांदणी चौक ते राजवाडा चौपाटी या रस्त्यावर नो हॉकर्स झोन तयार केला असला तरी अद्यापही याठिकाणी फळविक्रेत्यांना हटविण्यात आलेले नाही. अभयसिंहराजे भोसले शॉपिंग सेंटरच्या समोरचा फूटपाथ काही दिवसांपूर्वी मोकळा केला होता. मात्र, अद्यापही त्यावरून नागरिकांना चालता येत नाही. याबाबतही पालिकेने निर्णय घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
--शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सातारा शहरातील समस्यांचे निवारण करता येऊ शकते. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक बनले आहे.
-अभिजित बापट
नगरपालिकेने नुकत्याच झालेल्या सभेत वाहने पार्किंगच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पार्किंगसाठी जागेची मागणी करणे आवश्यकच होते. मात्र, शहरातील बऱ्याचशा इमारतींच्या बेसमेंटमध्ये पार्किंगची जागा दुकान गाळ्यांनी घेतली आहे. अशा गाळेधारकांवर कारवाई होणे आवश्यक असून, पालिकेने ही कारवाई करावी.
- तेजस शिर्के