आफ्रिकन पोपट हरवल्यानं मालकाचा अन्नत्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 20:53 IST2019-05-12T20:50:27+5:302019-05-12T20:53:22+5:30

घरातील सदस्य गेल्यानं दु:ख; पोलीस ठाण्यातही धाव

owner leaves food after african parrot flies away | आफ्रिकन पोपट हरवल्यानं मालकाचा अन्नत्याग

आफ्रिकन पोपट हरवल्यानं मालकाचा अन्नत्याग

- दत्ता यादव 

सातारा : शुद्ध इंग्रजीत बोलणाऱ्या पोपटाला त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा शिकवली. मालक आल्यानंतर त्याचं स्वागत करायचं आणि पुढे त्यांचे जेवण होईपर्यंत खांद्यावर बसायचा हट्ट धरायचा, त्यांनी दिलेली फळं खायची.. कुटुंबातील व्यक्तीपेक्षा लळा लावणारा हा पोपट काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला आणि त्यांनी अक्षरश: अन्न त्यागाचा निर्णय घेतला.

साताऱ्यातील शाहूपुरी परिसरात राहणारे इम्तियाज सय्यद यांना पूर्वीपासूनच पक्षी पाळण्याचा छंद आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यातून पन्नास हजार रुपयांना आफ्रिकन पोपट विकत घेतला. या पोपटाला केवळ इंग्रजी भाषा अवगत होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आफ्रिकन पोपटाला हिंदी आणि मराठी भाषा अजिबात समजायची नाही. मात्र, तरीसुद्धा सय्यद यांनी पोपटाला आपली मातृभाषा शिकवण्याचा चंग बांधला. विशेष म्हणजे केवळ दोन महिन्यांत त्यांनी या पोपटाला हिंदी आणि मराठी भाषा शिकवली. इंग्रजीमध्ये पटाईत असलेल्या या पोपटाने कसलेही आडेवेडे न घेता सय्यद यांच्याकडून हिंदी भाषा अत्यंत चपलखपणे शिकली. चल आ जा, पानी पी, खाना खाने का वक्त हो गया. जल्दी चल, आगे जा के बैठ जा,’ असे बोलल्यानंतर आफ्रिकन पोपट त्यांचे ऐकून लगेच कृती करत होता.

गुड मॉर्निंग आणि गुड नाईट हे शब्द पोपटाकडून ऐकले नाही तर सय्यद बैचेन व्हायचे. घरात गेल्यानंतर पोपट त्यांच्या खांद्यावर बसून त्यांचे स्वागत करायचा. सय्यद यांचे जेवण झाल्यानंतरच तो त्यांच्या खांद्यावरून उतरून फळे खात होता. सय्यद यांच्या मुलीचे लग्न झाल्यामुळे घरात पती-पत्नी असे दोघेच असल्याने ते पोपटाला घरातला तिसरा सदस्य मानायचे. दत्तक घेतलेला हा माझा मुलगा आहे, असे ते आपल्या ओळखीतील लोकांना आवर्जून सांगत होते. पाच वर्षे पोपटाच्या सहवासात कशी निघून गेली, हे त्यांना समजेलच नाही. मुलगी सासरी निघून गेल्याची कसर या पोपटाने भरून काढल्यामुळे त्यांना कधी मुलीची कमतरता भासली नाही. 

काही दिवसांपूर्वी आफ्रिकन पोपट अचानक घरातून निघून गेला.  हे पाहून सय्यद यांना जबर मानसिक धक्का बसला. पोपटाला शोधण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. संपूर्ण सातारा त्यांनी पिंजून काढला. एवढेच नव्हे तर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आफ्रिकन पोपट हरवल्याची तक्रारही नोंदविली. तसेच सोशल मीडियावरही पोपट आणून देणाऱ्यास योग्य बक्षीसही दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतरही पोपट न सापडल्याने त्यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. 

माझ्या मुलाला मारू नका
इम्तियाज सय्यद यांनी सोशल मीडियावर सातारकरांना भावनिक साद घातली आहे. आफ्रिकन पोपटाच्या फोटोखाली त्यांनी हा माझा मुलगा घरातून निघून गेला आहे. तो कोणाला सापडल्यास त्याला मारू नका. तो तुमच्या खांद्यावर बसेल, त्याच्याशी प्रेमाने बोला, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 

Web Title: owner leaves food after african parrot flies away