कंपनीचा मालक पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: January 20, 2015 00:01 IST2015-01-19T22:16:39+5:302015-01-20T00:01:54+5:30
तासवडे स्फोट; कारण अस्पष्ट : कामगारांचे जबाब नोंदवले; पोलिसांकडून तपास

कंपनीचा मालक पोलिसांच्या ताब्यात
कऱ्हाड : तासवडे औद्योगिक वसाहतीमधील मिआॅसिस केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असून, कंपनी मालक डॉ. किशोर कुंभार याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पाटणमधील डॉ. किशोर कुंभार याची तासवडे औद्योगिक वसाहतीत डोंगर पायथ्याला मिआॅसिस केमिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीत रविवारी सायंकाळी स्फोट झाला. शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या उडून आग लागली व त्यातूनच हा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. मात्र, अद्याप स्फोटामागचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्याबाबत कसून तपास केला जात आहे. सोमवारी पोलिसांनी कंपनीतील कामगारांचे जबाब नोंदवले. ही घटना घडली त्यावेळी कंपनीच्या तळमजल्यात ट्यूलीन नावाच्या द्रवाचे दोन ड्रम होते. तसेच पॅरानॅट्रो फिनेल पावडरच्या पन्नास किलोच्या दहा बॅगा होत्या. या दोन्ही वस्तू ज्वलनशील आहेत. रविवारी काम सुरू असताना सुरुवातीला अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर तेथे स्फोट झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे. डॉ. किशोर कुंभार हे संशोधक असून, औषधांसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याचे काम कंपनीत केले जाणार होते. स्फोट झाला त्यावेळी या कच्च्या मालाचे मिश्रण करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी नोंदविलेल्या कामगारांच्या जबाबातून निष्पन्न झाली आहे. मिश्रणावेळी तापमान वाढल्याने हा स्फोट झाला की शॉर्टसर्किटमुळे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)
स्फोटामध्ये भाजून गंभीररीत्या जखमी झालेल्या अनिल कणसे याच्यावर मिरज येथे तर प्रभाकर कुंभार यांच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विश्वजित कुंभार व अजित देसाई या युवकांचे मृतदेह रविवारी रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. शवविच्छेदनावेळी रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.