टंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यातील गाळ काढला
By Admin | Updated: June 6, 2016 00:43 IST2016-06-05T23:44:39+5:302016-06-06T00:43:02+5:30
कापशी : पावसाळ्यात पाणीसाठा वाढणार; दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न- लोकमत जलमित्र अभियान

टंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यातील गाळ काढला
आदर्की : ओढ्यावर बंधारा होता पण; गाळाने तो संपूर्ण भरलेला. त्यामुळे पाणीसाठा होत नव्हता. त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कापशी येथील तरुण एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायतीने साथ दिली आणि बघता-बघता शेकडो ब्रास गाळ बंधाऱ्यातून काढण्यात आला. त्यामुळे आता या बंधाऱ्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार आहे.
फलटण तालुक्यातील कापशी हे गाव. २००४ मध्ये दुष्काळ पडला. त्यावेळी पाण्याची समस्या निर्माण झाली. यामधून युवकांनी धडा घेतला. त्यासाठी येथील तरुण एकत्र आले. त्यांनी श्रमदान व लोकसहभागातून गावच्या ओढ्यावर बंधारे बांधले. मात्र, गेल्या १० वर्षांत हे बंधारे गाळाने भरले. पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात साठू लागले. गाळामुळे पाणी वाहूनही जाऊ लागले. परिणामी बंधारे फक्त नावापुरतेच राहिले. तसेच धोम बलकवडी कालव्यातून येणाऱ्या पाण्याचाही उपयोग होईनासा झाला. याचा परिणाम विहिरींवर होऊ लागला. विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यातच गेल्या वर्षापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी युवक एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही साथ दिली.
आळजापूर-सासवड दरम्यान कापशी हद्दीत असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा पूर्णपणे गाळाने भरलेला होता. सर्वांनीच साथ दिली. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. शेकडो ब्रास गाळ काढण्यात आला. हा गाळ अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत टाकला. त्यामुळे जमीन सुपिक होण्यास मदत होणार आहे.
या बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे हजारो लिटर पाणी साठणार आहे. याचा परिणाम पाणीपातळीवर होणार आहे. विहिरींची पातळी वाढणार असल्याने पिकांना पाणी पुरेसे होणार आहे. थेंबथेंब पाणी साठवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर)
टंचाईवर मात
करण्यासाठी एकत्र...
कापशीत पाणीटंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी तरुण पुढे आले. येथे बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, या बंधाऱ्यात गाळ साठला होता. येणाऱ्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढवायचा असेल तर गाळ काढावा लागेल हे निश्चित केले. त्यानंतर बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली.
- दीपक कदम, माजी सरपंच