हवामान बदलामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:16+5:302021-02-05T09:18:16+5:30
कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके, तर ...

हवामान बदलामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव!
कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके, तर कधी थंडीचा तडाखा यामुळे पडणारे दवबिंदू यामुळे कांद्याच्या लहान रोपांवर करपा रोग तसेच मर रोगांमुळे कांदा पातळ झाला आहे. कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडत आहेत. महागडी औषधे वापरूनही काही फरक पडत नाही.
मागील काही महिन्यांपासून कांद्याचा बाजार वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. कांद्याला चांगला दर मिळाला तर कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेने शेतकरी कांद्याकडे लक्ष देत आहेत; पण वातावरण साथ देत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
गेल्या महिन्यात वातावरण निवळत असल्याचे जाणवत होते; पण सध्या अचानक धुक्यासह ढगाळ वातावरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. हे पाहता गतवर्षीप्रमाणे थंडी अपेक्षित असते; पण काहीच थंडी नाही. यामुळे हरबरा, ज्वारी, कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहे. मात्र, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासून वातावरणात चढ-उतार होताना दिसले. कधी चक्रीवादळाचा तडाखा, कधी कमी दाबाचा पट्टा, तर कधी अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केला तर यंदा अवकाळी पावसाचा सामना केला. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले तोपर्यंत पाऊस म्हणतो ‘मी पुन्हा येईन’ त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. ज्यांच्याकडे कांदा साठवायला सोय आहे, त्यांना दोन पैसे मिळाले. यंदा कांदा लागवडीस सुरुवात केली; पण ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने तो पूर्णपणे सडून गेला. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला; पण होत्याचं नव्हतं झालं. केलेला खर्च पूर्णपणे वाया जाऊन लाखो रुपयांचा फटका बसला.
चौकट..
शेतकरी चांगलाच हतबल...
शेतकरी रोपे आणून कांद्याची लागवड करत आहे; पण रोगाने रोपेसुद्धा पिवळी पडत आहेत. कांद्याची पात ही पिवळी पडत असल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे. या दिवसांत पिकांना थंडी पोषक आले, मात्र गेल्या काही दिवसांपासून गारवानंतर ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती कोरडी होत नसल्याने तणाचा प्रादुर्भाव तर ऊन नसल्याने पिकाला पोषक वातावरण नाही. सगळीकडे शेतात तणाचा भरणा दिसत आहे म्हणून शेतकरी वैतागला आहे. आज तरी शेतकरी हवामान बदलाची वाट पाहत आहे.
२९कुकुडवाड
माण तालुक्यात कांदा पिकावर करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतित आहे.