झेडपीत ६४ पैकी तब्बल ५६ चेहरे नवीन
By Admin | Updated: February 27, 2017 00:04 IST2017-02-27T00:04:47+5:302017-02-27T00:04:47+5:30
मिनी मंत्रालय : अनेकांना राजकीय वारसा; काहीजण पंचायत समिती टू जिल्हा परिषद

झेडपीत ६४ पैकी तब्बल ५६ चेहरे नवीन
नितीन काळेल ल्ल सातारा
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत यावेळी प्रथमच निवडून आलेल्या ५६ जणांचे पाऊल पडणार आहे. यामधील अनेकांना राजकीय वारसा आहे तर काहीजण पंचायत समितीतील कारकिर्द पूर्ण करून जिल्हा परिषदेत दाखल होत आहेत. एकूणच आताच्या निवडणुकीत ६४ पैकी तब्बल ५६ जण नवीन असून, काहींना राजकारणाचा गंधही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कामगिरी कशी होते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणारे आहे.
दरम्यान, माण तालुक्यातील माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांच्या दोघी स्नुषाही यावेळी सभागृहात दिसणार आहेत. दोन्ही जावा जिल्हा परिषदेत असणार असे उदाहरण झेडपीच्या बाबतीत बहुधा प्रथमच घडत आहे.
जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणतात. जिल्हा परिषदेतून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो. येथूनच अनेक योजना राबविण्यात येतात. विशेषत: करून ग्रामीण भागाचा विकास हा जिल्हा परिषदेवरच अवलंबून असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेला अनन्य साधारण महत्त्व आहे. परिणामी पंचायत समितीपेक्षा सर्वांनाच जिल्हा परिषद सदस्य व्हावे, अशी इच्छा असते. त्यामुळे दर निवडणुकीला अनेक चेहरे हे नवे असतात. यावेळी तर तब्बल ५६ जण हे जिल्हा परिषदेत प्रथमच पाऊल टाकणार आहेत. यामध्ये तर माण, पाटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर आणि सातारा या तालुक्यांतील सर्वजणच प्रथमच जिल्हा परिषदेला निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेची इनिंग ही सर्वस्वी नवीन असणार आहे.
माण तालुक्यात पाच गट असून, सर्वजण नवीन आहेत. यामधील माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषांना राजकीय वारसा आहे. आंधळी गटातील बाबासाहेब पवार हे माजी सरपंच आहेत. बिदाल गटातील अरुण गोरे हे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांचे चुलत बंधू आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असणारे अरुण गोरे प्रथमच जिल्हा परिषदेला निवडून आले असून, त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांचा पराभव केला आहे. कुकुडवाड गटात सुवर्णा देसाई या भाजपकडून निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांच्या त्या भावजय आहेत. देसाई यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील दिवंगत खाशेराव जगताप माण पंचायत समितीचे अनेक वर्षे सभापती होते. आई कांचनमाला जगताप या जिल्हा परिषद सदस्या होत्या. भाऊ वसंतराव जगताप हे सभापती होते.
पाटण तालुक्यातील सर्व सात गटांतील सदस्य हे नवीनच आहेत. म्हावशी गटातील राजेश पवार हे राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत. ते पंचायत समिती सदस्य आहेत. ते आता झेडपीत राजकीय कारकिर्द सुरू करणार आहेत. मल्हारपेठचे सदस्य विजय पवार हेही पंचायत समिती सदस्य असून, ते झेडपीत प्रथमच निवडून आले आहेत. मारुल हवेली गटातील सुग्रा खोंदू यांना राजकीय वारसा आहे. माजी सदस्य असणाऱ्या बशीर खोंदू यांच्या त्या पत्नी आहेत. शिवसेनेकडून त्या निवडून आल्या आहेत. मंद्रुळकोळे गटातील रमेश पाटील हाही नवखा चेहरा असून, राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांचे ते बंधू आहेत. काळगावचे आशिष आचरे हेही प्रथमच जिल्हा परिषदेत पाऊल टाकणार आहेत.
फलटण तालुक्यातील कांचन निंबाळकर, भावना सोनवलकर, जिजामाला नाईक-निंबाळकर, धैर्यशील अनपट हे झेडपीत प्रथमच आले आहेत. जिजामाला नाईक-निंबाळकर यांना मोठा राजकीय वारसा आहे. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या स्नुषा आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. सध्या त्या पंचायत समिती सदस्या आहेत. भावना सोनवलकर यांचे पती माणिकराव सोनवलकर यांनी झेडपीचे अध्यक्षपद सांभाळले आहे. अनपट यांच्या पत्नी मावळत्या जिल्हा परिषदेत सदस्या होत्या. कांचन निंबाळकर या माजी उपसभापती आहेत.
खंडाळा तालुक्यातील दीपाली साळुंखे, उदय कबुले, मनोज पवार हे तिघेही प्रथमच जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून येत आहेत. यामधील साळुंखे या पंचायत समितीच्या सभापती होत्या. कबुले व पवार यांनी स्थानिक राजकारणात पदे भूषविली आहेत. जावळी तालुक्यात तीन गट असले तरी यावेळी कुसुंबी गटातील अर्चना रांजणे या प्रथमच निवडून आल्या आहेत. त्यांना राजकीय वारसा नाही. महाबळेश्वर तालुक्यात दोन गट असून, दोन्ही सदस्य प्रथमच निवडून येणारे आहेत. भिलार गटातून नीता आखाडे तर तळदेवमधून प्रणिता जंगम निवडून आल्या आहेत. त्यांनाही राजकीय असा वारसा नाही.
सातारा तालुक्यातील सर्वजण प्रथमच जिल्हा परिषदेत पाऊल टाकणार आहेत. मनोज घोरपडे यांना राजकीय वारसा आहे. वनिता गोरे याही राजकारणात आहेत. रेश्मा शिंदे यांचे पती मावळत्या जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्या तुलनेत प्रा. शिवाजीराव चव्हाण, अर्चना देशमुख, कमल जाधव, प्रतीक कदम, अनिता चोरगे, भाग्यश्री मोहिते, मधू कांबळे हे सदस्य राजकारणाचे धडे गिरवणार आहेत.
कऱ्हाड तालुक्यातील १२ पैकी ११ जण हे झेडपीसाठी नवीन चेहरे असणार आहेत. यामधील बहुतेकांना राजकीय वारसा नाही. प्रथमच ते राजकारणात आले आणि यशस्वी झाले आहेत. सागर शिवदास, प्रदीप पाटील, सुरेखा जाधव, वनिता पलंगे, उदयसिंह पाटील, निवास थोरात, मंगल गलांडे, शंकर खबाले, प्रियांका ठावरे, शामबाला घोडके, गणपत हुलवान हे नवीन सदस्य आहेत. यामधील उदयसिंह पाटील यांना मोठा राजकीय वारसा आहे. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे ते पुत्र आहेत. प्रदीप पाटील हे तांबवेचे सरपंच होते. शिवदास हे सामाजिक कार्यात असतात. वाई तालुक्यातील संगीता मस्कर, प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, रंजना डगळे हे नवखे आहेत.
नगरसेवक, डॉक्टरांचाही समावेश...
खटाव तालुक्यातील सहापैकी पाच गटांतील सदस्य हे जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवीन आहेत. सुनीता कदम या धैर्यशील कदम यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पंचायत समिती सभापती पदही मिळविले आहे. प्रदीप विधाते हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांच्या पत्नी पंचायत समिती सभापती होत्या. कल्पना खाडे यांना राजकीय वारसा आहे. सुनीता कचरे यांचे दीर राजकारणात सक्रिय असतात. शिवाजी सर्वगोड हे येळीवचे सरपंच होते. कोरेगाव तालुक्यातच चौघेजण नवीन असून मंगेश धुमाळ, जयश्री फाळके यांना मोठा राजकीय वारसा नाही. डॉ. अभय तावरे यांचे वडील सरपंच होते. डॉ. तावरे हे वाठार स्टेशन येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. जयवंत भोसले हे सातारा नगरपालिकेते नगरसेवक होते. यावेळी त्यांनी राजकारणासाठी कोरेगाव तालुका निवडला असून, ते यशस्वीही झाले आहेत.
एककाळ असा होता की, जिल्हा परिषदेत येताना सदस्य लेंगा, धोतर, तीन बटणांचा शर्ट घालून येत होते. दूरवरून यायचे म्हटले तर एसटीचा प्रवास करून ते जिल्हा परिषदेतील बैठकीला हजर व्हायचे; पण आता काळ बदलला.
४कधीतरी दुचाकी, साध्या गाड्यातून येणारे सदस्यही चक्क आता महागड्या गाड्यांतून येत आहेत. त्या गाड्याही १०-१५ लाखांहूनही अधिक किमतीच्या असतात. त्यामुळे ‘गेले ते दिवस’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. यालाच म्हणतात काळाचा महिमा.