टपाल तिकीटावर झळकण्याची सातारकरांना संधी!
By Admin | Updated: August 19, 2014 23:43 IST2014-08-19T23:11:44+5:302014-08-19T23:43:37+5:30
‘माय स्टॅम्प’ : पोस्टाच्या अभिनव योजनेस उत्साहात प्रारंभ

टपाल तिकीटावर झळकण्याची सातारकरांना संधी!
सातारा : नोकरीसाठी अर्ज, राख्या पाठविण्यासाठी प्रत्येकाने केव्हाना केव्हा पाकिट पाठविले असेल. त्यासाठी आवश्यकता भासते ती टपाल तिकीटाची. पाकिटाच्या वजनाएवढे विविध किमतीचे तिकीटे घेत असतो. याच तिकीटावर फोटो झळकविण्याची संधी सातारकरांना उपलब्ध झाली आहे. या योजनेस मंगळवारी मुख्य टपाल कार्यालयात प्रारंभ झाला.
टपाल तिकीटावर आपलाही फोटो असावा, हे स्वप्न अनेकांनी पाहिलेले पाहिलेले असल्यास ते आता नक्कीच सत्यात उतरणार आहे. व्यवसायवृद्धीसाठी टपाल खात्याने ‘माय स्टॅम्प’ ही अभिनव योजना आणली आहे.
या योजनेचे उद्घाटन ‘एलआयसी’चे प्रादेशिक अधिकारी संजीव मोहिते यांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी प्रवर अधीक्षक डाकघर आर. एन. कुलकर्णी होते. गणेश वडूरकर, धीरज कदम, शशिकांत गंगावणे, मनोज विभूते उपस्थित होते.
या योजनेंतर्गत आपल्या फोटोचे तिकीट प्रसिद्ध कराणाऱ्यांसाठी पोवई नाक्यावरील मुख्य टपाल कार्यालयात एक अर्ज उपलब्ध आहे. हा अर्ज भरून दिल्यानंतर त्यासोबत पॅनकार्ड, रहिवास दाखला व ओळखपत्राची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याठिकाणीच आपला फोटो काढून काही वेळातच तिकीटाची प्रिंट दिली जाईल, किंवा पोस्टाने घरपोच केली जाईल. टपाल खात्याने यासाठी एनआयसीचे सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे.
हे तंत्रज्ञान चालविण्यासाठी दिल्ली येथे खास प्रशिक्षण आयोजित केले होते. यासाठी सातारा जिल्ह्यातून चार कर्मचारी गेले होते. तिकीटासाठी काही थिम तयार आहेत. यामध्ये ताजमहाल, राशीचक्र, फुले, पंचतंत्र हे सध्या उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)