उघडले कोयनेचे दार
By Admin | Updated: August 7, 2016 23:00 IST2016-08-07T23:00:05+5:302016-08-07T23:00:05+5:30
तीन फुटांनी उचलले : कोयना नदीपात्रात १८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

उघडले कोयनेचे दार
पाटण : कोयना धरणातील पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी तीन फुटांनी उघडले. धरणातून कोयना नदीपात्रात १७,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त आहे. पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सहा वक्री दरवाजांमधून १५,६०० असा सुमारे १७,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
तीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयना, नवजा, महाबळेश्वर, काठी वळवण, कारगाव, सोनाट, बामणोली, प्रतापगड अशी नऊ पावसाची ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणांवरील पर्जन्यमापकावर १ जूनपासून ३ ते ४ हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे ३६, नवजा येथे ३८, तर महाबळेश्वरमध्ये १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
३.६ टीएमसी पाण्याची आवक
धरणाचे दरवाजे रविवारी उघडले त्यावेळी धरणात ८६.१८ टीएमसी पाणीसाठा होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३.६ टीएमसी होती.
असा असेल प्रवास
धरणातून रविवारी दोनच्या सुमारास पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाण्याला पाटणला पोहोचण्यास चार तास, तर कऱ्हाडला पोहोचण्यास आठ तास लागतात. तेच पाणी २४ तासांनंतर सांगलीत पोहोचते. त्यामुळे किती गावे पुराने संपर्कहीन झाली, हे सोमवारी दुपारपर्यंत समजेल.
जुलैमधील पावसाने आधार
कोयना धरणात १ जून रोजी केवळ दहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. जून व निम्मा जुलै महिना गेला तरी पाऊस झाला नाही. ९ ते १२ जुलै कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीपर्यंत पोहोचला.
पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी
धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ६ आॅगस्ट रोजी पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर रविवार (दि. ७) पासून धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे.
कोयना धरणातील पाणी पुढील तीन दिवस स्थिर ठेवण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास दरवाजे पुन्हा बंद करण्यात येतील. १५ आॅगस्टपर्यंत धरणात ९५ टीएमसी पाणीसाठा राखून ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.
- वैशाली नारकर,
अधीक्षक अभियंता, कोयना धरण