साताऱ्यात खुलेआम ‘खुला बार’
By Admin | Updated: August 22, 2015 00:54 IST2015-08-22T00:54:55+5:302015-08-22T00:54:55+5:30
ऐतिहासिक ठिकाणंही तळीरामांच्या कचाट्यात : दारू पिण्यासाठी वडापाव अन् आम्लेटच्या गाड्यांचा बिनधास्त वापर; रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना प्रचंड त्रास

साताऱ्यात खुलेआम ‘खुला बार’
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
सावित्रीच्या लेकींच्या पुढाकारामुळे गावागावांतील बाटली आडवी झाली, त्यामुळे एकेकाळी जिल्ह्याचा राज्यात गवगवा होता; पण आता काळ बदलला आहे. सातारा शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर खुला बार पाहायला मिळत आहेत. खिशातून बाटल्या आणायच्या अन् वडापाव, आम्लेटच्या गाड्यांवर जाऊन दारू ढोसायची, हाच धंदा सुरू झाला आहे.
राजवाडा चौपाटी परिसर, जुना मोटार स्टॅण्ड, खालचा रस्ता, राधिका रस्ता, बसस्थानक तसेच पोवई नाका परिसरातील गाडे यासाठीच प्रसिद्ध आहेत. बहुसंख्य गाडे दारू दुकानाच्या परिसरात आहेत. त्यामुळे त्यांना चांगलीच चलती आहे. त्यातील मोजक्या गाड्यांवर चोरून दारू विकली जात असली तरी खिशातून बाटली आणून पिणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे.
राजवाडा परिसरातील तांदूळआळीत दारूची अनेक दुकाने आहेत. तेथून खरेदी करून जवळच असलेल्या नगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत बसून तळीरामांची मैफल जमत असते. या ठिकाणी फेरफटका मारला असता, ग्लास व बाटल्यांची झाकणं पडलेली पाहायला मिळतात. या ठिकाणी कोणीही पहारेकरी नसल्याने तळीरामांकडे दारूसाठी पैसे नसतील, तर या इमारतीचेच गज काढून ते भंगारात विकतात. त्याच पैशातून मद्य आणून पित असतात, असा आरोप स्थानिकांमधून केला जात आहे.
एकेकाळी जिल्ह्यातील गावचे गावे दारूबंदीच्या मोहिमेत सहभागी होत होते. गावातून बिअर बारबरोबरच दारूही हद्दपार केली जात होती.