Ladki Bahin Yojana: सातारा जिल्ह्यात आठ लाखांवर अर्ज मंजूर, किती बहिणींनी नाकारला लाभ.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: January 23, 2025 12:27 IST2025-01-23T12:25:01+5:302025-01-23T12:27:13+5:30

जानेवारीचा हप्ता लवकरच

Only three women ladki bahin yojana in Satara district denied the benefit | Ladki Bahin Yojana: सातारा जिल्ह्यात आठ लाखांवर अर्ज मंजूर, किती बहिणींनी नाकारला लाभ.. जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: सातारा जिल्ह्यात आठ लाखांवर अर्ज मंजूर, किती बहिणींनी नाकारला लाभ.. जाणून घ्या

नितीन काळेल

सातारा : निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू असून, शासनाकडूनही याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मात्र, याला सातारा जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद असून, आतापर्यंत फक्त तीन महिलांनी लाभ नाकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही आठ लाखांवर ‘लाडक्या बहिणी’ आहेत.

मागील वर्षी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना सुरू केली. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. आतापर्यंत सहा हप्ते बहिणींना मिळाले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने बहिणींना दीड हजारावरून २ हजार १०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीला सत्ता देण्यात ही योजनचा गेमचेंजर ठरल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच आता निकषात न बसताही लाभ घेतल्याने अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. तसेच निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांनी योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रतिसाद आहे.

जिल्ह्यातील तीन महिलांनी योजनेतून बाहेर पडण्याबाबत अर्ज केला आहे. या महिला सातारा, फलटण आणि कोरेगाव तालुक्यातील आहेत. यामधील दोघींनी पूर्वी या योजनेचा लाभ घेतला. पण, आता शासकीय नोकरीत निवड झाल्याने त्यांनी लाभ नाकारला आहे. त्यांनी लाभ मिळालेली रक्कमही परत केली आहे. तसेच एका महिलेने वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर असल्याने लाभापासून दूर राहण्याबाबत अर्ज केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तिघी बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे. तरीही पुढील काळात तपासणी झाल्यास अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र ठरू शकतात.

सातारा जिल्ह्यातील माहिती..

  • योजनेसाठी अर्ज प्राप्त - ८,३३,२१३
  • अर्ज मंजूर - ८,१९,५४९
  • नामंजूर - २,०३५
  • प्रलंबित तपासणी अर्ज - २,७१३
  • योजनेचा लाभ - २१ ते ६५ वयोगटातील महिला
     

..हे अपात्र ठरणार

  • अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
  • चारचाकी वाहन असणे
  • लग्नानंतर इतर राज्यात वास्तव्य


जानेवारीचा हप्ता लवकरच

राज्य शासनाने जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचे जाहीर केले आहे. २६ जानेवारीपासून पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. पण, २ हजार १०० रुपये देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे दीड हजार रुपयेच मिळणार आहेत.

तालुकानिहाय अर्ज मंजूर
तालुका - मंजूर अर्ज

जावळी - ३०,७६४
कऱ्हाड - १,५३,३९५
खंडाळा - ३८,६५३
खटाव - ७९,१५९
कोरेगाव - ७२,७२८
महाबळेश्वर - १६,८९२
माण - ६२,६५६
पाटण - ८६,९६१
फलटण - ९५,९५६
सातारा - १,२७,०८९
वाई - ५५,२६६

Web Title: Only three women ladki bahin yojana in Satara district denied the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.