पोलिसांनीच हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:12+5:302021-09-07T04:47:12+5:30
सातारा : खरं तर कुठेही गुन्हा घडल्यानंतर आपल्या सोयीनुसार नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकतात; पण नागरिकांना याउलट ...

पोलिसांनीच हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा
सातारा : खरं तर कुठेही गुन्हा घडल्यानंतर आपल्या सोयीनुसार नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकतात; पण नागरिकांना याउलट अनुभव येतो. तक्रार न घेता आधी हद्द कुठली ती सांगा, अशी विचारणा करून तक्रारदाराला इकडे जा तिकडे जा, असा सल्ला पोलीस देतात. त्यामुळे अगोदरच अन्यायातून व्यतीत झालेल्या तक्रारदाराला आणखीनच अन्याय झाल्याची भावना निर्माण होते.
तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कोणाच्या हद्दीत घडला याची विचारणा पोलिसांकडून तक्रारदाराला होते. तो गुन्हा दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यास तक्रारदाराकडे तिकडे पाठवले जाते. प्रत्यक्षात सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे. तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या पोलीस ठाण्याची असल्यास नंतर तो गुन्हा त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे पोलिसांकडून घडत नाही. तक्रारदाराला वेगवेगळे किस्से अनुभवयास येतात. तक्रार दाखल करण्याअगोदरच तक्रारदाराला हतबल केले जाते. त्यामुळे त्याला तत्काळ न्याय मिळेल, या विषयी त्यांच्या मनात शंका उपस्थित होते. वास्तविक कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे बंधनकारक असले तरी आमचाही विचार होणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे मत आहे. त्याचे कारण म्हणजे अगोदरच प्रत्येक पोलिसाकडे पंधरा ते वीस गुन्हे असतात. कामाचा ताणही प्रचंड असतो. त्यामुळे तक्रार दाखल करून घेतल्यानंतर त्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे पोलीस शक्यतो ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला आहे, त्याच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगतात.
चाैकट : ही घ्या उदाहरणे...
इथे नव्हे वाईला जा..
गेल्या महिन्यामध्ये एका युवकाला वाईमध्ये घरात डांबून मारहाण करण्यात आली होती. तो युवक महाबळेश्वरचा होता, तर गुन्हा करणारे युवक हे साताऱ्याचे होते. त्यामुळे तो युवक साताऱ्यात तक्रार देण्यासाठी आला. मात्र, त्याला गुन्हा कुठं घडलाय आणि तू कुठे तक्रार देण्यासाठी आला आहेस, असं पोलिसांनी त्याला सुनावलं. इथे नव्हे वाई पोलीस ठाण्यात जा, असाही त्याला सल्ला दिला. त्यानंतर इथून वाई पोलीस ठाण्यात गेला.
चाैकट : दोन दरवाजामुळे हद्दीचा घोळ
साताऱ्यातील शनिवार पेठेतील काही भाग सातारा शहर, तर काही भाग शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. काही दिवसांपूर्वी शनिवार पेठेतील एका घरात चोरी झाली. त्यावेळी संबंधित घर मालक सुरुवातीला शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला तुमचे घर पुढच्या बाजूला आहे. त्यामुळे तुम्ही शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जा, असा सल्ला त्यांना देण्यात आला तर शाहूपुरी पोलिसांनी तुमचं घर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं, असं सल्ला दिला. त्यांचं घर लांबीला मोठं होतं. पुढचा रस्ता आणि मागचा रस्ता असे दरवाजे घराला होते. त्यामुळे पोलिसांना गैरसमज झाला. पण नंतर शाहूपुरी पोलिसांनीच तक्रार दाखल करून घेतली.
चाैकट : तक्रार नोंदवलीच नाही..
एका युवकाचा मोबाइल चोरीस गेला. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मोबाइल गहाळ झाला, असा उल्लेख केला गेला. संबंधित युवकाला मोबाइल चोरीस गेला, अशी एफआयआर प्रत हवी होती. पण त्याची तक्रार न घेताच त्याचा मोबाइल पोलिसांनी रजिस्टरमध्ये ‘गहाळ’ केला.
चाैकट : तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई
पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्यास पाेलिसांचे निलंबनही होऊ शकते. सुरुवातीला खातेंतर्गत चाैकशी लावली जाते. या चाैकशीत सत्य समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक संबंधित कर्मचाऱ्याला कामामध्ये हयगय, निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून निलंबितही करू शकतात.