रॉकेल उरेल फक्त दिवा बत्तीसाठी...!
By Admin | Updated: December 16, 2014 23:38 IST2014-12-16T22:25:40+5:302014-12-16T23:38:45+5:30
शिधापत्रिकाधारक : शासनाकडून एक लिटर रॉकेल

रॉकेल उरेल फक्त दिवा बत्तीसाठी...!
सातारा : गॅसधारक असो किंवा नसो प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला मात्र १ लिटरच रॉकेल दुकानदाराकडून दिले जात आहे. शासनाच्या नियमानुसार व्यक्तीच्या संख्येनुसार रॉकेल दिले जाते; परंतु हा नियम धाबावर ठेवून स्वस्त धान्य दुकानदार पुरवठा कमी येत असल्याने प्रति कार्डधारकाला एक लिटरच रॉकेल देत आहे. त्यामुळे शासनाकडून फक्त दिवा बत्तीसाठीच रॉकेल मिळत आहे, अशी प्रतिक्रीया नागरिकांतून होत आहे.
शासनाकडून शिधापत्रिका धारकांना पर व्यक्तीनुसार रॉकेलचे वाटप केले जाते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या फलकानुसार विना गॅसधारकाला पर व्यक्ती २ लिटर तर गॅसधारक (एक सिलेंडर) व्यक्तीला १ लिटरचा उल्लेख आहे; परंतु मागणीनुसार फक्त ३० टक्के रॉकेल शासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी एका शिधापत्रिकेवर फक्त १ लिटर रॉकेल देत आहेत. या लिटरभर रॉकेलमध्ये एका दिवसाचा स्वयंपाकही होणे मुश्किल आहे. त्यामुळे शासनाने आमची थट्टाच केली आहे, असे नागरिकांनी मत व्यक्त केले.
दरम्यान, अनेक ठिकाणी आजही रॉकेलसाठी मोठ्या रांगा लागत आहेत. तर काही विक्रेते पहाटेच रॉकेल वाटप करत असून सकाळी आठ वाजेपर्यंत संपूर्ण रॉकेलचे वाटप झाल्याचे सांगतात. त्यामुळे जे पहाटे येथील त्यांनाच रॉकेल मिळते आणि सकाळी नऊनंतर येणाऱ्यांना रॉकेल मिळत नाही, अशी परिस्थिती शहरातील काही भागात पाहावयास मिळते. केवळ एक लिटर रॉकेलसाठी जवळपास दोन तास नंबर लावावा लागतो. (प्रतिनिधी)
५
सूचना फलकाचे गोडबंगाल
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या दालनातच शासनाचा शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या रॉकेलचा अनुदानाचा फलक लावला आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण भागाचा उल्लेख असून विना गॅसधारकांना प्रती माणसी दोन लिटर आहे. या व्यक्तींची मर्यादा पंधरा लिटरपर्यंत आहे. तर एक गॅसधारकांना रॉकेलची मर्यादा ४ लिटर आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, शासनाकडून १५ लिटरपर्यंत रॉकेल मिळत असताना केवळ एकच लिटर कसे मिळते, याची दखल पुरवठा विभाग का घेत नाही. परंतु याच फलकाच्याखाली नकळत पुरवठा उपलब्धतेनुसार वाटप करण्याची अटही आहे. असे असले तरी फलकावर एक लिटरचा उल्लेख कोठेही नाही.
शासनाच्या नियमानुसार परव्यक्ती विनागॅसधारकाला एक लिटर, तर गॅसधारकाला परव्यक्ती अर्धा लिटरचे वाटप करण्यात येते. परंतु सध्या रॉकेलच्या मागणीपेक्षा एकूण ३० टक्के रॉकेल शासन देते.
- शमा पवार, पुरवठा अधिकारी
शासनाचे एकप्रकारचे आभार आहेत. किमान कार्डामागे १ लिटर तरी रॉकेल मिळते. या रॉकेलमुळे घरची दिवाबत्ती लावता येते. कार्डाचा वापरही आतातरी लिटरसाठीच होत आहे.
- विनोद कामटे, कार्डधारक