उरले अवघे ३३ टीएमसी पाणी
By Admin | Updated: June 28, 2014 00:33 IST2014-06-28T00:31:20+5:302014-06-28T00:33:47+5:30
सातारा जिल्हा : उरमोडी, तारळी वगळता कोठेही समाधानकारक साठा नाही

उरले अवघे ३३ टीएमसी पाणी
सातारा : सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे धरणांच्या जिल्ह्यात अवघे ३३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सातारा तालुक्यातील उरमोडी आणि पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्प सोडला तर अन्य प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्याची एकूण पाणीसाठवण क्षमता २३0 टीएमसीहून अधिक आहे तर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पाचशे टीएमसीच्या आसपास आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात फक्त १४.५४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा ३५.६५ टीएमसी इतका कमी आहे. विशेष म्हणजे कोयना धरणात उपलब्ध असणाऱ्या १४.५४ टीएमसीपैकी ७ टीएमसी पाणीसाठा मृत आहे.
सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, महू, हातगेघर, नागेवाडी, मोरणा-गुरेघर, उत्तरमांड, तारळी, नीरा-देवघर, वांग-मराठवाडी तर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असणारी वीर, भाटघर ही प्रमुख धरणे आहेत. इतर लघुपाटबंधारे प्रकल्प तसेच तलावांची संख्या अधिक आहे. या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २३0 टीएमसीहून अधिक आहे. आजमितीस विचार करता यापैकी फक्त ३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या दिवशी सर्वच धरणांमध्ये ८२ टीएमसी इतका पाणीसाठा होता.
उरमोडी आणि तारळी धरण वगळता जिल्ह्यात इतर कोणत्याही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाही. पावसाचे आगमन आणखी लांबणीवर पडले तर भयंकर अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पावसानेही जिल्ह्यात दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. बहुतांशी भागात पेरण्या झाल्या असल्यातरी त्या ठिकाणीही आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात यावर्षात आजअखेर ७९७ मि.मी. पाऊस झाला असून तालुकानिहाय सरासरी ७२.५ मि.मी. इतकी आहे. (प्रतिनिधी)