दर नसल्याने कांदा उकिरड्यात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 13:49 IST2018-06-03T13:49:48+5:302018-06-03T13:49:48+5:30
शेतमालाला भाव नसल्याने शेतक-याचे कंबरडे मोडले असताना आता खटावसह परिसरात कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर ढासळल्याने हवालदील झाले

दर नसल्याने कांदा उकिरड्यात !
खटाव : शेतमालाला भाव नसल्याने शेतक-याचे कंबरडे मोडले असताना आता खटावसह परिसरात कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर ढासळल्याने हवालदील झाले आहेत. लहान आकाराचा कांदा केवळ दोन ते अडीच रुपये किलो या दराने विकला जात असून, दराअभावी कांदा उकिरड्यात टाकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
खटावसह परिसरात ब-याच शेतक-यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु कांद्याला योग्य दर नसल्याने शेतकरी अडचणीत तर सापडला आहेच, त्याचबरोबर वाढती उष्णता तसेच बदलत चाललेल्या हवामानाचा फटकाही शेतकºयाला बसत आहे. कांदा काढणीस सुरुवात झाल्यानंतर कांद्याचा बाजारपेठेतील दर अचानक उतरल्यामुळे शेतक-यांनी कांदा ऐरणीत साठवून ठेवला
असून, योग्य दर येण्याची वाट पाहत आहे. शेतक-याला कांद्याचा रोप विकत घेऊन त्याची लागण, भांगलण, खत तसेच काढणी
आणि त्यानंतर दर नसेल तर तो ऐरणीत साठवून ठेवण्यासाठी एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. परंतु, कांद्याला योग्य दर न मिळाल्यास याचा मोठा फटका शेतक-यांना सोसावा लागत आहे.
सध्या व्यापा-याकडून कांदा बघून दर दिला जात आहे. पाच रुपये तसेच सहा रुपये दराने कांदा खरेदी केला जात आहे. त्यातच लहान आकाराच्या कांद्याचा केवळ दोन ते अडीच रुपये असा वेगळा दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतक-याला आता पावसाची धास्ती लागली आहे. या दराने जर कांदा विकला गेला तर शेतकºयाला भांडवलसुद्धा मिळेनासे झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.