कांद्याने केला बळीराजाचा वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:07+5:302021-04-05T04:36:07+5:30

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी मोही शिंगणापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून ...

Onion made Banda Raja's Wanda | कांद्याने केला बळीराजाचा वांदा

कांद्याने केला बळीराजाचा वांदा

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी मोही शिंगणापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र कोसळलेल्या दरामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रतिक्विंटल अवघा आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजाचा वांदा केल्याचे विदारक चित्र परिसरात दिसत आहे.

मागील वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजारांपर्यंत भाव होता. पण सप्टेंबरपर्यंत सलग व जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच जणांचा कांदा शेतातच नासून गेला तर अनेकांचा कांदा उगवलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्याकडे कांदाच नव्हता, अशी परिस्थिती होती.

पावसाने शेतीचे पूर्णपणे नुकसान होऊनही बळीराजाने पुन्हा नव्या जोमाने कांद्याची दुबार तर काहींनी तिबार पेरणी केली. पावसाने सगळीकडेच कांदा व रोपे नासून गेल्याने बियाणांचे दर प्रतिकिलो चार हजारांपर्यंत भडकले होते. तरीही उसनवारी करून दिवाळीच्या सुमारास पाच महिन्याचे गरवा कांदा बियाणे पुन्हा पेरले. सध्या सर्वत्र कांद्याची काढणी व काटणीची कामे जोमात सुरू असली तरी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने काटलेल्या कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

सध्या दर पडल्याने कांदा खरेदीसाठी व्यापारीही फिरकत नसल्याने शेतातच कांदा वाळून जाऊ लागला आहे. कांदा हेच या परिसरातील नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकातून मिळालेला पैसा पुढच्या पिकात भांडवल म्हणून वापरला जातो; पण या हंगामात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने खर्चाचे गणित कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.

कांद्याला किमान दोन हजार दर मिळावा, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

(चौकट)

भांडवली खर्चही निघेना..

सध्या आठशे ते नऊशे असा कवडीमोल दर असून, कांदा पिकासाठी मशागत, बियाणे, औषधे, खते, खुरपणी, काढणी काटणी, साठवण व्यवस्थापन अशा बाबींवर केलेला भांडवली खर्च पाहता शेतकरी पूर्णतः तोट्यात गेल्याचे दिसत आहे.

(चौकट)

बेरोजगारांचा सवाल...

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने थैमान घातले असून, पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असलेल्या अनेकांची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. भीतीने कित्येकजण आज गावी शेतीत राबत आहेत. पण शेतमालाला दर नसल्याने आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोट..

सरकारनं आमच्या पिकाचं नुकसान झाल्यावर कवडीमोल नुकसानभरपाई देण्यापेक्षा आमच्या पिकांना रास्त भाव द्यावा, असं वाटतं.

- आनंदराव कचरे, शेतकरी, पळशी

०४पळशी

फोटो : कांद्याचे दर कोसळल्याने पळशी (ता. माण) परिसरात कांदा वाळून जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Onion made Banda Raja's Wanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.