उंब्रज जवळील अपघातात एक ठार

By Admin | Updated: February 2, 2016 01:05 IST2016-02-02T01:05:59+5:302016-02-02T01:05:59+5:30

उसाच्या ट्रॉलीला धडक : हवेची पिशवी उघडल्याने चालक बचावला

One killed in an accident near Umbraj | उंब्रज जवळील अपघातात एक ठार

उंब्रज जवळील अपघातात एक ठार

उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील पेरले हद्दीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकजण ठार असून, चालक जखमी आहे. सचिन विलास नवले असे ठार झालेल्याचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस घेऊन ट्रॅक्टर-ट्रॉली (एमएच ११ यू ५९१४) हा सोमवारी पहाटे एकच्या सुमारास काशीळहून सह्याद्री कारखान्याकडे निघाला होता. तो पेरले हद्दीत आला असता ट्रॉलीला कार (एमएच ९ बीएस ८००२) ने पाठीमागून धडक दिली. यामध्ये चालकाशेजारी बसलेले सचिन विलास नवले (वय ३०, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हवेची पिशवी उघडल्याने चालक प्रवीण नामदेव चव्हाण (रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) हे जखमी झाले. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक प्रवीण चव्हाण यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार हेमंत मुळीक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
गाडीचा चक्काचूर
हा अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास झाला. माहिती मिळाल्यानंतर पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, कार ट्रॉलीखाली आत लांबपर्यंत शिरली होती. त्यामुळे कार बाहेर काढणे अवघड जात होते. क्रेन बोलावून गाडी बाहेर काढली. यामध्ये गाडीचा चुक्काचूर झाला आहे. तत्पूर्वी जखमींना गाडीतून बाहेर काढून दवाखान्यात पाठविण्यात आले. तपासल्यानंतर डॉक्टरांनी सचिन नवले यांना मृत घोषित केले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, हवेच्या पिशवीमुळे चालक वाचला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Web Title: One killed in an accident near Umbraj