शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात एकास एक...
By Admin | Updated: August 28, 2014 22:21 IST2014-08-28T22:13:18+5:302014-08-28T22:21:20+5:30
सातारा-जावळी विधानसभा : विरोधकांच्या हालचाली सुरू; लढत लक्षवेधी होण्याचे संकेत

शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात एकास एक...
सातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राजकीय विरोधक त्यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने अंतर्गत बैठकाही सुरू असून उमेदवाराची घोषणा काही दिवसांतच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, हा मतदारसंघ महायुतीच्या माध्यमातून कोणाकडे जाईल, याविषयी अजूनही निश्चित असे काही ठरले नसल्यामुळे कोणी बोलायलाही तयार नाही. परिणामी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एकतर्फी असणारा हा मतदारसंघ आता लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत आहेत.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात जावळी तालुका, सातारा शहर आणि ग्रामीण भाग समाविष्ट आहे. येथे असणारी बहुतांशी सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या आणि पर्यायाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या ताब्यात आहेत.
जावळी तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विचार करता सातारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे आणि सेना-भाजप युतीचा विचार करता गतवेळी हा मतदारसंघ भाजपकडे होता. येथून नरेंद्र पाटील भाजपचे उमेदवार होते.
आता मात्र, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच हा मतदारसंघ आता भाजपकडेच राहणार की सेनेकडे जाणार याविषयी ठामपणे सांगता येत नाही.
२00९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात भाजपचे नरेंद्र पाटील, बहुजन समाज पार्टीचे प्रशांत चव्हाण, स्वाभिमानी पक्षाच्या वर्षा देशपांडे, लोकजन शक्ती पार्टीचे प्रदीप शिवदास आणि अलंकृता बिचुकले, किशोर धुमाळ, संजय जाधव हे सात उमेदवार होते.
गेल्यावळचे उमेदवार यंदा असतील की नाही, याविषयी सांगता येत नाही.मैत्रीपूर्ण लढती झाल्या अथवा दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तर येथून शिवेंद्रसिंहराजे भोसले पुन्हा उमेदवार असणार याविषयी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
सातारा विधानसभा मतदारसंघात जरी मैत्रीपूर्ण लढतीचा विचार झाला तर येथून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याचा शोध घ्यावा लागणार आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच राहिल, अशी शक्यता गृहीत धरूनच रवींद्र पवार, दत्ताजी थोरात व नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीला राम-राम करून शिवबंधन हाती बांधण्यासाठी निघालेले राजेंद्र चोरगही पुन्हा एकदा शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीच ‘एकास एक उमेदवार’ देण्याचा पुढाकार घेतला असल्याचे समजते. (प्रतिनिधी)