पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित कोरेगावमधून दोघांना मिळाली संधी
By Admin | Updated: May 8, 2015 00:18 IST2015-05-07T22:53:48+5:302015-05-08T00:18:06+5:30
माने यांचे सहकारात पदार्पण...

पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित कोरेगावमधून दोघांना मिळाली संधी
साहिल शहा - कोरेगाव -कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून बालेकिल्ला म्हणून नावलौकिक असलेल्या कोरेगाव तालुक्याने पुन्हा एकदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पक्षाला विजयश्री मिळवून दिली आहे. बँकेच्या निकालाने तालुक्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. तालुक्यातून यावेळी दोघांना संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राजकीयदृष्ट्या जागरुक असलेल्या या तालुक्याने आजवर नेहमी एकाच पक्षाला साथ दिली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी काँग्रेसचा पारंपरिक गड म्हणून ओळखला जात असलेला हा तालुका राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पगडा या तालुक्यावर आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत या तालुक्याने राष्ट्रवादीला सत्तास्थानावर आरुढ केले आहे, हे विशेष.
जावळीतून कोरेगावात डेरेदाखल झालेल्या शशिकांत शिंदे यांनी तब्बल दोनवेळा राष्ट्रवादीतून आमदारकी मिळवली आहे. त्यांनी पक्षाची सर्व जिल्हाध्यक्षपदे आपल्याच तालुक्यात ठेवून पक्षसंघटना मजबूत केल्याने काही अपवाद वगळता सर्वत्र राष्ट्रवादीचा झेंडा फडकत असतो. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येऊ घातल्यानंतर तालुक्यातील गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारा मोठा गट या तालुक्यात कार्यरत असल्याने बँक निवडणुकीत वेगळी समीकरणे तयार होऊ शकत असतानाच आमदार शशिकांत शिंदे यांनी बँकेच्या निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती ठेवत पक्षाला वर्चस्व मिळवून देण्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांना बँकेचे दरवाजे खुले केले होते.
सातारा जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक लालासाहेब शिंदे व शाहूराज फाळके यांना थांबण्यास सांगून नवीन चेहरे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. स्वत: ते जावळीतून उभे राहिले असल्याने त्यांना कोरेगावात काही अडचण नव्हती.
माने यांचे सहकारात पदार्पण...
लालासाहेब शिंदे यांना डावलल्याने ते नाराज होते, आणीबाणीच्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला आणि आता संधी असताना आपल्याला का डावलले जात आहे, या विचाराने ते संतप्त होते. लालासाहेब शिंदे हे काही करून थांबत नसल्याने अखेरीस अजित पवार यांनी मध्यस्थी केल्याने शिंदे यांनी सुनील माने यांना पाठिंबा देऊ केला होता. शिंदे थांबले असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र नाराजीच्या लाटेतच होते. शिंदे यांचा अर्ज राहिल्याने आणि मतपत्रिकेवर नाव असल्याने मतदारांनी त्यांना मते देत आपण बरोबर असल्याचे दाखवून दिले होते. सुनील माने यांनी जोरदार तयारी केल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपाठोपाठ माने यांचे आता जिल्हा पातळीवरील सहकार चळवळीत पर्दापण झाल्याने आता त्यांचा राजकीय प्रवास गतीने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.