डोंगरमाथ्यावर गाढवानाची जुनी व पारंपरिक पध्दत अद्यापही टिकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:16+5:302021-04-04T04:40:16+5:30

पेट्री : कास परिसरातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेती, घरकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धतींसह अडचणीच्या ठिकाणी माल वाहून ...

The old and traditional method of donkey climbing still survives! | डोंगरमाथ्यावर गाढवानाची जुनी व पारंपरिक पध्दत अद्यापही टिकून!

डोंगरमाथ्यावर गाढवानाची जुनी व पारंपरिक पध्दत अद्यापही टिकून!

पेट्री : कास परिसरातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेती, घरकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धतींसह अडचणीच्या ठिकाणी माल वाहून नेण्यासाठी गाढवानाची जुनी व पारंपरिक पद्धत आजही टिकून आहे. सर्व पारंपरिक वारसा जतन होत असल्याचे चित्र प्रकर्षाने या भागात पाहावयास मिळते.

कासपठार परिसरातील अतिदुर्गम, डोंगरमाथ्यावर पर्जन्यवृष्टी मोठ्या स्वरूपात असते. परिसरातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असून, शेतकरी प्रामुख्याने भात, नाचणी, वरी पिके घेतात; परंतु निसर्गाचे बदलते ऋतुचक्र, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे वन्य पशु-पक्ष्यांकडून होणारी नासधूस यामुळे शेतीचे प्रमाण कमी होत असून, बहुतांशीजण उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी पुणे, मुंबई शहरांचा मार्ग स्वीकारतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानींचा गावाकडे शेती करण्याचा कल वाढला आहे.

गावाकडील शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर गुरांचे पालन करतात. पाऊस जास्त असल्याने कौलारू घरं पाहायला मिळतात. शेती, घरबांधकाम, बांबूकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती जोपाासल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दुर्गम, डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी माल वाहून नेण्यासाठी अद्यापही लाकडी गाढवानाचा उपयोग केला जात आहे. ज्यावेळी रस्ते नव्हते त्यावेळी हेच साधन असायचं. पूर्वी घर बांधायला लागणारे सर्व साहित्य गाढवानाच्या साधनाने वाहून नेले जायचे. जिथे रस्ता नाही, गाडी जात नाही, अशा ठिकाणी हेच साधन उपयोगी पडते. सध्या रस्ते झाल्याने ही परंपरा लुप्त होत असली तरी, काही अवघड वाडी-वस्तीच्या ठिकाणी मालवाहतुकीसाठी गाढवानाचा वापर होत आहे.

(चौकट)

शेतीच्या बांधावर तालीबांधकाम, कौलारू चिकणमातीच्या घराचे बांधकाम, घरांच्या संरक्षणासाठी झडपी, बांबू कामापासून विविध वस्तू, खळ्यावर भात नाचणीची मळणी, नांगरणीसाठी बैलाचा औत, ढोलताशाच्या गजरात कामगत पद्धतीने गवतकापणी, पाटाने किंवा आड करून शेतीला पाणी पुरवणे, पैरा पद्धतीने शेती, उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षणासाठी घरासमोर मांडव (गरिबांचा कुलर), पावसापासून संरक्षणासाठी इरली, पिकांच्या संरक्षणासाठी मचाणी अशा अनेकविध पारंपरिक पद्धती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत.

(कोट)

पूर्वी बहुतांश घरांसाठी लागणारे साहित्य गाढवानाद्वारेच नेले गेले. या पद्धतीमुळे कष्ट व खर्च वाचला जातो. लाकडाऐवजी टायरचा देखील गाढवानासाठी वापर केला जातो. यामुळे अडचणीच्या ठिकाणी मालवाहतूक करणे सोपे जाते.

- रमेश शिंदे, सह्याद्रीनगर, ता. जावळी

Web Title: The old and traditional method of donkey climbing still survives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.