जिल्ह्यातून वाहताहेत तेलकट नद्या!
By Admin | Updated: March 17, 2016 23:49 IST2016-03-17T22:11:39+5:302016-03-17T23:49:39+5:30
जलजागृती सप्ताह : कमी पाण्यातच वाहनांची धुलाई; पुढील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात--खोल-खोल पाणी !

जिल्ह्यातून वाहताहेत तेलकट नद्या!
सातारा : जिल्ह्यात मार्चपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नद्या अटल्या आहेत. त्यातच काही महाभाग वाहने धूत असल्याने ग्रीस, आॅईल पाण्यात सांडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतून तेलकट नद्या वाहत आहेत. हेच पाणी पुढील भागातील ग्रामस्थ पित असल्याने त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.पाणी-पाणी म्हणून मराठवाडा बारा महिने टाहो फोडत असतानाच पावसाचा सातारा जिल्हा मात्र आम्ही सधन, धरणवाले अशी समजूत करून निवांत होते. मोठ्या प्रमाणावर डोंगरी भाग लाभलेला असतानाही म्हणावे तेवढे पाणी अडविता आले नाही. याचा फटका यंदा जाणवायला लागला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भागात मार्चपासूनच पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. माण, खटावची जनता डिसेंबरपासून वणवण करून पाणी भरत आहे; पण कधी नव्हे ती सातारकरांवरही पाणीटंचाईची टांगती तलवार लटकत आहे.
अनेक नद्या अटल्या असून, काही नद्यांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. अनेक गावांसाठी नद्या याच प्रमुख जलस्रोत आहे. त्यांची तहान याच नद्या भागवत आहेत. पण काही लोक पुढील गावांतील जनतेचा विचारच करत नाहीत. दुचाकी, कार, जीप नद्यांमध्ये नेऊन बिनधास्त धूत आहेत.
यामुळे वाहनांतील ग्रीस, तेल, आॅईल पाण्यात मिसळत आहे. कमी प्रवाहामुळे पाण्यावर तेलाचा तवंग पसरत आहे. हेच पाणी पुढील गावातील लोक पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरी भागातील हे चित्र आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही आहे. ग्रामीण भागात कमी पाण्याच्या डोहातच म्हशींना डुंबायला सोडले जाते. याच नद्यांमध्ये जनावरे धुणे, कपडे धुतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. (प्रतिनिधी)
रक्षाविसर्जनावर हवाय पर्याय
अनेक समाजात अंत्यविधीनंतर नद्यांमध्ये रक्षाविसर्जन केले जाते. तसेच निर्माल्य, कपडे व इतर साहित्य नद्यांमध्ये टाकले जातात. काही महिन्यांपूर्वी एका शिक्षकाने रक्षाविसर्जन नदीत न करता वृक्षारोपण करून रोपांच्या खड्ड्यांत टाकले होते. यामुळे वडिलांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत, अशी त्यांची धारणा आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलसप्ताह साजरा केला जात आहे. या काळात या प्रकारे जनजागृती करण्याची गरज आहे.
जनतेतूनच हवीय जागृती
नदी पात्रांमध्ये वाहने धुणे, गावातील कचरा टाकणे, औद्योगिक वसाहतीतील अशुद्ध पाणी टाकण्यामुळे जलप्रदुषण होत आहे. यासाठी केवळ कागदावर जलजागृती करुन चालणार नाही. त्यासाठी शालेय स्तरावर योग्य ती जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
- प्रा. डॉ. दादासाहेब नवले