तांबवेतील टाकी बांधणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

By Admin | Updated: June 26, 2016 00:34 IST2016-06-26T00:26:53+5:302016-06-26T00:34:52+5:30

ग्रामसेवकांची फिर्याद : शासन, ग्रामस्थांच्या फसवणुकीचा आरोप

Offense of contractual builders for copper tank | तांबवेतील टाकी बांधणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

तांबवेतील टाकी बांधणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

कऱ्हाड : तांबवे येथील चोवीस तासांत पाण्याची टाकी बांधणाऱ्या दोन ठेकेदारांवर कऱ्हाड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ग्रामसेवक प्रमोद रामचंद्र ठोके यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा, शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.
नरेंद्र वसंत जानुगडे व संभाजी पाटील (दोघेही रा. मलकापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबवे येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने तत्कालीन ग्रामसेवक संभाजी धाबुगडे यांनी फेब्रुवारी २०१० मध्ये ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या उपअभियंत्यांना प्रकल्प आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याबाबतचे पत्र दिले.
मे २०१० मध्ये ग्रामसभेत याबाबतचा ठराव घेण्यात आला. आॅगस्ट २०१० मध्ये मंत्रालयाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार अव्वर सचिवांनी सप्टेंबर २०१० मध्ये भारत निर्माणच्या अधीक्षक अभियंत्यांना पेयजल अभियान दोन टप्प्यांत पूर्ण करण्याबाबत सांगितले. तांबवे पाणीपुरवठा समितीने याबाबत निविदा मागविल्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या तीन निविदांपैकी मलकापूरच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड अर्थमुव्हर्सची निविदा कमी दराची असल्याने ठराव करून हे काम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. गावातील रघुनाथ मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस शिवरत्न कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांनी १ लाख ३० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली. ४ मे २०१३ रोजी तिचे उद्घाटन झाले. त्यानंतर तीनच वर्षांत १३ जून २०१६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली. पाण्याची टाकी बांधताना ठेकेदारांनी निकृष्ट प्रतीचे साहित्य वापरल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे शिवरत्न कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार नरेंद्र वसंत जानुगडे व संभाजी पाटील यांनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी शासनाकडून १३ लाख रुपये घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे केले. बांधकामामध्ये कमी दर्जाचे सिमेंट व स्टीलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Offense of contractual builders for copper tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.