भित्तीचित्रावरून उदयनराजे-शंभुराज यांच्यात बिनसले!, शंभूराज देसाई म्हणाले..
By दीपक देशमुख | Updated: March 7, 2023 19:39 IST2023-03-07T19:16:53+5:302023-03-07T19:39:37+5:30
चित्र काढण्यास शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनी हरकत घेतली

भित्तीचित्रावरून उदयनराजे-शंभुराज यांच्यात बिनसले!, शंभूराज देसाई म्हणाले..
सातारा : पोवई नाक्यावरील इमारतीवर उदयनराजेंचे भित्तीचित्र काढण्यास पोलिसांनी हरकत घेतली. यावरून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खा. उदयनराजे यांच्यात वितुष्ट आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, याबाबत खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाचे पदाधिकारी यांची शंभुराज देसाई यांच्या बंगल्यावर तसेच पोलिस अधीक्षकांच्या दालनात बैठका झाल्या. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.
याबाबत माहिती अशी, खासदार उदयनराजे भोसले यांच्या इमारतीच्या भिंतीवर राजे समर्थकांना त्यांचे चित्र रेखाटायचे होते. पोवई नाक्यावरील ही इमारत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाशेजारीच आहे. चित्र काढण्यास शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनी हरकत घेतली. संबंधित कारागिराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे राजे समर्थकांच्या नाराजीतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
त्यानंतर शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर उदयनराजे समर्थक सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पंकज चव्हाण यांची शंभूराज यांच्यासमवेत बैठक झाली. काटकर यांनी सर्व वस्तुस्थिती देसाई यांच्या कानावर घालून सर्व बाबी या पूर्वपरवानगीने असल्याचे सांगितले. छायाचित्र रेखाटन हा प्रकारच मला माहीत नव्हता. खासदार उदयनराजे भोसले हे आमचे जवळचे मित्र व पक्षातील सहकारी आहेत. त्यांचे रेखाचित्र चितारले जाणार असेल तर मला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
रेखाचित्र प्रकरणावर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या दालनातही बैठक झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, संग्राम बर्गे, मनोज शेंडे, प्रीतम कळसकर, प्रशांत अहिरराव, भाऊ चौगुले, गणेश जाधव संदीप शिंदे उपस्थित होते. बैठकीत रेखाचित्र प्रकरणाला पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. गैरसमजुतीतून पोलिसांनी कारागीराला हटकल्याचे कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना सांगितले.
याबाबत सुनील काटकर म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराण्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. रेखांकन प्रकरणात जी माहिती व्हायरल झाली, त्यामध्ये तथ्य नाही. कोणीही उदयनराजे भोसले व शंभूराज देसाई यांच्यात वितुष्ट असल्याचे राजकीय गैरसमज करू नयेत. या प्रकरणावरून कोणताही तणाव नाही. कोणीही या प्रकरणाचा गैरअर्थ काढू नये, असे आवाहन काटकर यांनी केले आहे.