परिचारिका चार अन् अख्ख्या कोरोना हॉस्पिटलचा भार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:54+5:302021-09-06T04:43:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : खंडाळा तालुक्यात गेल्या दीड वर्षात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण ...

परिचारिका चार अन् अख्ख्या कोरोना हॉस्पिटलचा भार...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्यात गेल्या दीड वर्षात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या अकरा हजारांच्या वर पोहोचली; परंतु आरोग्य प्रशासनाच्या दक्ष कारभारामुळे लोकांचे जीव वाचविण्यात यश आले. ग्रामीण रुग्णालयातील कोरोना विभाग बंद करण्यात आल्याने तालुक्यात सध्या एकाच ठिकाणी कोरोना सेंटर कार्यरत आहे. परंतु, येथील वैद्यकीय पथकाला कार्यमुक्त करण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनावर भार आला आहे. केवळ चार परिचारिकांच्या खांद्यावर ग्रामीण रुग्णालय व कोरोना सेंटर अवलंबून असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटेत बाधित रुग्णांवर चांगले उपचार करता यावेत, यासाठी तालुक्यातील खासगी हॉस्पिटलसह ग्रामीण रुग्णालय व जगताप हॉस्पिटल या दोन ठिकाणी शासकीय कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. तालुक्यात कोरोना प्रसार आटोक्यात आल्याने गावोगावचे विलगीकरण कक्ष सध्या बंद आहेत तसेच उपचारासाठी दाखल होणारी रुग्णसंख्याही घटली असल्याने ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटर बंद करून तेथे सर्वसामान्य रुग्णालय चालविण्यात येत आहे. मात्र, कोरोनाकाळात याठिकाणी सेवेत घेतलेल्या सहा परिचारिकांची सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच जगताप हॉस्पिटलला सध्या दोनशे बेडचे कोरोना सेंटर कार्यरत आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांचा सगळा भार याच रुग्णालयावर आहे. तरीही जिल्हा प्रशासनाने कोरोना उपचाराची सेवा देणाऱ्या सोळा परिचारिकांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील सहा व ग्रामीण आरोग्य पथकातील दोन अशा एकूण आठच परिचारिकांवर या दोन्ही रुग्णालयांचा भार आहे.
ग्रामीण रुग्णालयात सध्या सामान्य तपासणी, अपघात रुग्ण, प्रसुती महिला यासह अन्य आजाराच्या रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. तेथे चार परिचारिकांना चोवीस तास सेवा पुरवावी लागत आहे तर जगताप हॉस्पिटलला कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी चार परिचारिका काम करत आहेत. त्यामुळे अनेकदा बारा-बारा तासांची ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. दोन्ही हॉस्पिटलच्या सेवेचे नियोजन करताना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
(पॉईंटर)
-जगताप हॉस्पिटल कोरोना सेंटर हे महामार्गावर खंडाळा ते शिरवळ दरम्यान आहे. येथे जाण्यासाठी एस. टी. बस किंवा खासगी वाहनांची सोय नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ड्युटी करणाऱ्या स्टाफला स्वतःच्या वाहनाशिवाय तेथे पोहोचणे अवघड बनत आहे. ज्यांची वाहनाची सोय नाही त्यांची मोठी अडचण होत आहे.
-खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले होते. तालुक्यात सध्या १२२ कोरोनाबाधित आहेत. शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २६, लोणंद केंद्रांतर्गत ४० तर अहिरे केंद्रांतर्गत ५६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ७५ रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
(कोट)
ग्रामीण रुग्णालय व जगताप हॉस्पिटल दोन्हींचे नियंत्रण शासनाकडे आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात दिलेल्या परिचारिकांच्या सेवा खंडित केल्याने दोन्हीकडे स्टाफ पुरविणे जिकरीचे होत आहे. मात्र, तरीही सर्वांचे सहकार्य असल्याने सेवा देणे सुरू आहे. परिचारिका संख्या कमी असल्याने अडचणीही येत आहेत - डॉ. रवींद्र कोरडे, वैद्यकीय अधीक्षक