घोटातला घोट आता पदपथावरच्या झाडांना!

By Admin | Updated: May 27, 2016 21:57 IST2016-05-27T21:43:37+5:302016-05-27T21:57:33+5:30

राजपथावर सौंदर्य : साताऱ्यातील मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ-मोरगाव गु्रपचा पथदर्शी प्रकल्प-लोकमत जलमित्र अभियान

Now the ghost hit the trees on the pavement! | घोटातला घोट आता पदपथावरच्या झाडांना!

घोटातला घोट आता पदपथावरच्या झाडांना!

सातारा : तीव्र उन्हाळ्याच्या झळा सोसताना आता पाणीटंचाईचा प्रश्न नव्याने सर्वांपुढे आ वासून उभा आहे, याच प्रश्नावर उत्तर शोधताना येथील मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव गु्रप यांच्या वतीने राजपथावर मोती चौक ते मारवाडी भवन या परिसरात पाम व फायकस या झाडांची कुंड्यांमध्ये लागवड केली आहे. या कुंड्यांमुळे हा परिसर आणखी सुंदर तर झाला आहेच, त्यासोबत पाणी बचतीचा एक पथदर्शी प्रयोग राबविला गेला आहे.
राजपथावर मोठी व्यापारी पेठ आहे, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात वृक्षांची संख्या अत्यल्प आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामध्ये या परिसरात सावलीचा आधारच नसल्याचे अनेकांना लक्षात आला.
व्यापारी पेठेत खरेदीसाठी ग्राहकवर्गाची नेहमी लगबग असते. तीव्र उन्हाळ्यामुळे व्यापाऱ्यांनी ग्राहकांना पाण्याची सोय केली आहे; परंतु अनेकदा लोक पाणी पितात आणि भांड्यात उरलेले पाणी रस्त्यावर ओतून देतात, हे लक्षात आल्यानंतर मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव गु्रपच्या कार्यकर्त्यांनी राजपथावर मोती चौक ते मारवाडी भवन या अंतरात पाम व फायकस या दोन प्रकारच्या झाडांच्या तब्बल ३६ कुंड्या ठेवल्या.
‘पिल्यानंतर भांड्यात उरलेले पाणी या झाडांना घाला, पाणी वाया घालवू नका,’ अशी विनंती या व्यापाऱ्यांनी ग्राहकांना काही दिवस केली.
मात्र, त्यानंतर झाड पाहिल्यानंतर पाणी रस्त्यावर ओतून न देता, ते झाडाला ओतू लागले. सकाळी फिरायला येणारे लोक तर
बाटलीत पाणी घेऊन येतात
आणि या कुंड्यांतील झाडांना घालतात.
अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मोरेश्वरावर श्रद्धा ठेवून याठिकाणी मोरगाव गु्रप स्थापन झाला. दर चतुर्थीला या गु्रपचे सर्व सदस्य मोरगावला दर्शनासाठी जात असतात. या गु्रपमध्ये २५ वर्षांच्या तरुणापासून ७० वर्षांपर्यंतच्या वृद्धांचाही समावेश आहे.
मोरेश्वराच्याच प्रेरणेने या लोकांनी हा परिसर सुंदर केला. पाणी बचतीचा नवा अध्याय निर्माण केला. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्वत: या ठिकाणाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. पालिका काही दिवसांत ग्रीन सिटीची संकल्पना राबविणार आहे, यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात
आम्ही सर्व ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अगदी युवकांपासून ते गृहिणी, छोटे-मोठे व्यावसायिकही ‘जलमित्र’ बनून पाणीबचत करून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत.(प्रतिनिधी)

मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव ग्रुप यांच्या वतीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. देवी चौक ते राजवाडा हा संपूर्ण परिसर हिरवागार करण्यासाठी नगरपालिकेच्या ग्रीन सिटी प्रकल्पाला आमचा कायमच हातभार राहील.
- संतोष लुणावत, व्यापारी

Web Title: Now the ghost hit the trees on the pavement!